नांदेड : पाच वर्षे आमच्याकडे २३७ आमदार आहेत, आम्ही महायुतीत काम करतो. ज्यांना युतीत राहायचे त्यांनी रहावे ज्यांना नसेल रहायचे ते बाहेर पडतील, असे खणखणीत प्रत्युत्तर पालकमंत्री अतुल सावे यांनी शिवसेना आमदाराच्या नाराजी पत्रावर विचारलेल्या प्रश्नाला दिले. मंत्री सावे यांच्या भूमिकेमुळे शिवसेना आमदारांना धक्का बसला आहे. भाजपला आता शिवसेनेची गरज नाही, असे सूचक विधान त्यांनी दिल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली होती.
पालकमंत्री अतुल सावे हे सोमवारी जिल्हा दौऱ्यावर हाेते. त्यांच्या उपस्थितीत विविध विभागांच्या बैठका तसेच पक्षाची आढावा बैठक संपन्न झाली. तद्नंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी वार्तालाप केला. तांडा वस्ती निधी वाटपावरून नांदेड जिल्ह्यातील हदगावचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार बाबुराव कदम यांनी उघड नाराजी व्यक्त करत मंत्री सावे यांना पत्र लिहिले होते. तसेच भाजपचे आमदार डॉ. तुषार राठोड यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. त्यामुळे तांडा वस्ती सुधार योजनेच्या निधीवरून आमदारांमध्ये असलेली नाराजी पुढे आली होती.
दरम्यान, पालकमंत्री सावे हे सोमवारी दौऱ्यावर असताना त्यांना आमदारांच्या नाराजीबाबत विचारले असता त्यांनी तांडा वस्ती सुधार योजनेच्या निधीसाठीचे प्रस्ताव आमदारांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पाठविले अपेक्षित आहे. ज्यांचे प्रस्ताव आले, त्यांना निधी दिलेला आहे. यापूर्वी मी स्वत आमदार तुषार राठोड यांना १ कोटी ९० लाख रुपयांचा निधी दिलेला असल्याचेही त्यांनी सांगितले. तर कदम हे पहिल्यांदाच निवडून आलेत, त्यांना प्रस्ताव कुणामार्फत येतात किंवा कोण मंजुरीला पाठवतो, याची पडताळणी करावी, अगोदर त्याची माहिती घ्यावी, असा सल्लाही आमदार बाबुराव कदम यांना दिला. तांडा वस्ती सुधार योजनेचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडून येत असतात, तक्रारी करणाऱ्या आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे जाऊन बसावे. त्यांच्या भागातील तांड्याचे प्रस्ताव आणि कामाबाबत त्यांच्यामार्फत प्रस्ताव पाठवावेत. आमदार राठोड यांना विचारा गतवर्षी किती निधी आला होता, हे तर नवीन आमदार आहेत, त्यांचे प्रस्ताव अजून आले नाहीत असे सावे म्हणाले.
आमदार पाटलांच्या पुढाकारातून गैरसमज दूर!तांडा वस्ती सुधार योजनेतील निधी वाटपावरून आमदार बाबूराव कदम यांनी पालकमंत्री सावे यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. तद्नंतर जिल्हा दौऱ्यावर असलेल्या मंत्री सावे यांनीदेखील शिवसेना आमदाराच्या पत्रावरून विचारलेल्या प्रश्नाला सडेतोड उत्तर दिले. दरम्यान, हा वाद वाढू नये, आमदाराची भूमिका ही जनसामान्यांची भावना असून प्रत्येक मतदार संघाला समान न्याय मिळावा, अशी भूमिका पालकमंत्र्यांनी घ्यावी या अनुषंगाने मंत्री सावे यांच्याशी चर्चा करून आमदार कदम यांचे झालेले गैरसमज दूर करत दोघांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी आमदार पाटील यांनी पुढाकार घेतला. तसेच एकाच मतदारसंघात अधिक निधी जाऊ नये, त्यामुळे कोणी तरी एकच व्यक्ती निधीचे नियोजन करत आहे, असा समज आमदारांमध्ये पसरत आहे. यामध्ये पालकमंत्र्यांनी स्वत: लक्ष घालावे, अशी मागणीदेखील आमदार पाटील यांनी केली.