नांदेड : धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊ नये यासाठी अॅड. प्र्रकाश आंबेडकर यांना आघाडीसोबत घेण्याचे प्रयत्न शेवटपर्यंत केले. प्रकाश आंबेडकर यांच्या निवासस्थानी ५ ते ६ वेळा भेटी दिल्या मात्र अॅड. आंबेडकर हे आघाडीसोबत आले नाहीत. याची मनापासून खंत आहे. भारतीय संविधान बदलू इच्छिणारे भाजपचे सरकार हटवण्याची गरज असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले.नांदेडमध्ये जयभीमनगर, गंगाचाळ या भागात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, पीआरपी, रिपाइं, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बहुजन विकास आघाडी, मित्रपक्षाचे उमेदवार अशोक चव्हाण यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेण्यात आल्या. या सभेस माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, आ. शरद रणपिसे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी भाजप सरकार आरएसएसच्या विचारावर चालणारे आहे. भारतीय संविधान बदलण्याचे आरएसएसचे प्रयत्न सुरुच आहेत. भाजप सरकारच्या काळात संविधान जाळण्यात आले. संविधान जाळणारे, संविधानाचा अपमान करणाऱ्यांना धडा शिकविण्याची वेळ आल्याचेही चव्हाण म्हणाले. अॅड. प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केल्याचेही त्यांनी सांगितले. भाजपच्या जातीयवादी सरकारने नांदेड जिल्ह्याचा कोट्यवधींचा दलितवस्ती विकास निधी रोखला. त्यामुळे या सरकारला आता अब की बार बस कर यार म्हणण्याची वेळ आल्याचे ते म्हणाले.माजी मंत्री हंडोरे यांनी देशात भारतीय राज्यघटनेऐवजी मनुस्मृती अंमलात आणण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप केला. त्याचवेळी आरएसएस, विश्व हिंदू परिषद व सनातनचे पदाधिकारी देशाला हिंदू राष्ट्र करण्याच्या प्रयत्नात असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे राज्यघटना बदलू इच्छिणाऱ्यांना धडा शिकविण्याची वेळ आली आहे. भाजप सरकारच्या काळात महागाईचा आलेख वाढला आहे. सीबीआय, आरबीआय यासारख्या संस्था मोडीत काढण्याचा प्रयत्न झाल्याचाही ते म्हणाले. आ. रणपिसे यांनी जिल्ह्याचाच नव्हे, तर राज्याचा विकास करण्याची ताकद अशोक चव्हाण यांच्यामध्ये असल्याचे सांगितले. भाजपा या जातीयवादी सरकारच्या काळात मागासवर्गीयांच्या अनेक योजना बंद पडल्या. त्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मतांचे विभाजन होऊ देऊ नका, मत विभाजनासाठीच वंचित बहुजन आघाडी व सपा-बसपा निवडणुकीच्या रिंगणात असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी सुभाष रायबोले, रमेश गोडबोले यांचेही भाषण झाले.सभेस किशोर स्वामी, विरेंद्रसिंघ गाडीवाले, विलास धबाले, मोहिनी येवनकर, गणपतराव धबाले, विजय येवनकर, उमेश पवळे, संगीता डक, ज्योती रायबोले, नागनाथ गड्डम, दुष्यंत सोनाळे, संदीप सोनकांबळे, व्यंकट मुदीराज, प्रफुल्ल सावंत, रुपेश यादव, संतोष मानधने, बाळासाहेब देशमुख, प्रशांत सोनकांबळे, अमित वाघ, श्रावण वाघमारे, शेख फयुम, मो. सोहेल आदींची उपस्थिती होती.
राज्यघटना बदलण्याचा भाजपाचा डाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2019 12:18 AM
धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊ नये यासाठी अॅड. प्र्रकाश आंबेडकर यांना आघाडीसोबत घेण्याचे प्रयत्न शेवटपर्यंत केले. प्रकाश आंबेडकर यांच्या निवासस्थानी ५ ते ६ वेळा भेटी दिल्या मात्र अॅड. आंबेडकर हे आघाडीसोबत आले नाहीत. याची मनापासून खंत आहे.
ठळक मुद्देजयभीमनगरमध्ये अशोक चव्हाण यांचा घणाघात काँग्रेस-राष्ट्रवादीला बळ देण्याचे केले आवाहन