किनवट ( नांदेड ) : किनवट पालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षासह नगरसेवक पदाच्या ९ जागा जिंकून भारतीय जनता पार्टीने स्पष्ट बहुमत मिळविले़ सत्ताधारी राष्ट्रवादीला मागच्या तुलनेत दोन जागा व सत्ताही गमवावी लागली़ शिवसेनेला भोपळाही फोडता आला नाही. विसर्जित पालिकेत भाजपाचा एकही नगरसेवक नव्हता, हे विशेष़
१३ डिसेंबर रोजी पालिकेसाठी मतदान झाले होते़ १४ डिसेंबर रोजी मतमोजणी झाली़ यात भाजपाने नगराध्यक्ष पदाची निवडणूक जिंकत ९ जागा पटकाविल्या़ राष्ट्रवादी काँग्रेसने ६, काँग्रेसने २ तर एका अपक्षाने बाजी मारली़ भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंद मच्छेवार यांनी काँग्रेसचे शेख चाँदसाब रतनजी यांचा पराभव केला़ मच्छेवार यांना ६ हजार ३५८ तर शेख चाँदसाब यांना ४ हजार ५४७ मते मिळाली़ राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर हबीबोद्दीन चव्हाण यांनी २ हजार ९८१, राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार प्रवीण राठोड यांना २ हजार ७४८, शिवसेनेचे सुनील पाटील यांना केवळ १ हजार ३०२ मते मिळाली.
नगरसेवक पदासाठी विजयी प्रमुख उमेदवारात भाजपाचे व्यंकटराव नेम्मानीवार, श्रीनिवास नेम्मानीवार, अजय चाडावार, शिवाजी आंधळे, खान इम्रानखान इसा (काँग्रेस), अभय महाजन (काँग्रेस), कैैलास भगत (राष्ट्रवादी) यांचा समावेश आहे़ विद्यमान नगरसेवक शिवसेनेचे सुनील पाटील, सूरज सातुरवार, राष्ट्रवादीच्या प्रियंका राठोड, इंदुताई कनाके, काँग्रेसचे कृष्णा नेम्मानीवार यांना मतदारांनी नाकारले.