नांदेड : भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह महापालिका प्रभारी कामगारमंत्री संभाजी निलंगेकर, आ. सुजितसिंह ठाकूर, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांच्या दोन दिवसांच्या नांदेड दौºयात युतीचा प्रश्न बेदखलच झाला. त्याचवेळी भाजपाच्या या दौºयात प्रामुख्याने सेनेचे आ. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रवेशाचीच मोठी चर्चा झाली.महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीस प्रारंभ झाला असताना या रणधुमाळीच्या प्रारंभीच शिवसेनेने भाजपाशी युती व्हावी, अशी इच्छा प्रदर्शित केली होती. इतकेच नव्हे, तर शिवसेनेने महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने घेतलेल्या नगरसेवकाच्या बैठकीत विद्यमान जागा सोडून इतर जागेबाबत चर्चा करुन युती करावी, असाही प्रस्ताव ठेवला होता. बैठकीस सेनेचे दोन आमदार उपस्थित होते. मात्र त्यानंतर सेना आणि भाजपा महानगराध्यक्षात वाक्युद्ध झाले. त्यामुळे सेना-भाजपा युतीचा विषय बाजूलाच राहिला. प्रारंभी रद्द झालेला प्रदेशाध्यक्ष दानवे आणि कामगारमंत्री निलंगेकरांच्या दौºयात भाजपा कार्यकर्त्यांची बैठक एका हॉटेलमध्ये घेण्यात आली. बैठकीतील तपशील मात्र पुढे आला नाही. निवडणूक तयारीच्या अनुषंगाने सूचना दिल्याचे मोघम उत्तर देण्यात आले. भाजपाच्या महिला प्रदेश कार्यकारिणीची बैठक दोन दिवस नांदेडात झाली. या बैठकीत निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाली. या सर्व दौºयात भाजपाने शिवसेनेकडून महापालिका निवडणुकीसाठी आलेल्या युतीच्या प्रस्तावाबाबत अवाक्क्षरही काढले नाही. त्याचवेळी खाजगीमध्ये मात्र भाजपाकडून शिवसेनेसोबत युतीची गरज नसल्याचे सांगितले जात आहे.दुसरीकडे भाजपा नेत्यांच्या दौºयात प्रामुख्याने चर्चा झाली. सेनेचे आ. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या भाजपाप्रवेशाची. चहापानादरम्यान बंद दाराआड झालेली चर्चा ही राजकीय विषय ठरली. तब्बल एक तास प्रदेशाध्यक्ष दानवे आणि चिखलीकरांमध्ये चर्चा झाली. यावेळी भाजपाच्या काही पदाधिकाºयांनाही चर्चेपासून दूर ठेवण्यात आले होते. त्यामुळे या चर्चेचे गूढ अधिकच वाढले आहे. तसेच सेनेसह राष्ट्रवादी व अन्य काही पक्षांच्या नगरसेवकांची उपस्थिती आगामी राजकीय घडामोडीचे संकेत देत होते.त्याचवेळी रिपाइंने मात्र आपल्यासाठी १२ जागा सोडण्याचा प्रस्ताव भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्यापुढे ठेवला आहे. रिपाइंचे राज्य उपाध्यक्ष विजय सोनवणे, शहराध्यक्ष मिलिंद शिराढोणकर आदींनी दानवे यांची भेट घेऊन चर्चा केली. या विषयावरही भाजपाने मौन बाळगले.
भाजपा नेत्यांच्या दौºयात युतीचा प्रश्न बेदखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 12:12 AM