पोटनिवडणुकीपूर्वी भाजपला खिंडार; भास्करराव खतगावकर, ओमप्रकाश पोकर्णा कॉंग्रेसमध्ये परतणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2021 07:07 PM2021-10-18T19:07:03+5:302021-10-18T19:07:51+5:30
नांदेड जिल्ह्यात खा. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या एककल्ली कारभाराला वैतागून आपण पक्ष सोडत असल्याची प्रतिक्रिया खतगावकर यांनी दिली.
नांदेड- देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना त्या मतदारसंघात वर्चस्व असलेले भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्यासह माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी भाजपला रामराम केला आहे. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला असून, काँग्रेसची ताकद वाढली आहे.
नांदेड जिल्ह्यात खा. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या एककल्ली कारभाराला वैतागून आपण पक्ष सोडत असल्याची प्रतिक्रिया खतगावकर यांनी दिली. तीन वेळेस देगलूर-बिलोली मतदारसंघाचे आमदार आणि तीन वेळेस खासदार असलेले भास्करराव पाटील खतगावकर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपत आले होते. त्या वेळी जिल्हा भाजपची सर्व सूत्रे त्यांच्या हातात होती. परंतु, मागील लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रताप पाटील चिखलीकर हे सेनेतून भाजपत आले. भाजपच्या तिकिटावर निवडून येत त्यांनी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा पराभव केला होता. त्यामुळे पक्षात त्यांचे वजन वाढले होते. त्यानंतर जिल्हा भाजपतील सर्व निर्णय चिखलीकर हेच घेत होते. त्यामुळे खतगावकर गोटात नाराजी होती.
राजकीय समीकरणे बदलणार
देगलूर-बिलोली मतदारसंघ पोटनिवडणुकीत उमेदवार ठरवतानाही खतगावकर यांचे मत विचारात घेतले नाही. याबाबत पक्षनेतृत्वाकडे तक्रार करूनही नेतृत्वाने चिखलीकरांनाच ताकद दिली. त्यामुळे खतगावकर यांनी अखेर भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये घरवापसीचा निर्णय घेतला. रविवारी पत्र परिषद घेऊन त्यांनी ही घोषणा केली. त्यांच्यासोबत माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा आणि समर्थकांनीही भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. खतगावकरांच्या घरवापसीमुळे बिलोली मतदारसंघातील राजकीय गणितेही बदलणार आहेत. भाजपला मोठा धक्का आहे.
काँग्रेस प्रवेशाच्या घोषणेचे स्वागत- चव्हाण
दरम्यान, पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी प्रतिक्रिया देताना नेते माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या घोषणेचे मी स्वागत करीत असल्याचे म्हटले तसेच खतगावकरांच्या प्रवेशामुळे मराठवाड्यातील पक्षसंघटनेला अधिक बळकटी मिळेल.