नांदेडमधील पोटनिवडणुकीत भाजपाला भोपळा, काँग्रेसचा मोठा विजय
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2020 03:47 PM2020-02-07T15:47:44+5:302020-02-07T15:47:57+5:30
जिल्ह्यातील नांदेड-वाघाळा महानगर पालिकेच्या प्रभाग क्र. 11 (ड) मध्ये काँग्रेसचे
नांदेड - जिल्ह्यातील महानगरपालिका, नगर परिषद व नगर पंचायतच्या पोटनिवडणुकीत 6 पैकी 5 जागा जिंकून काँग्रेसने सहजच विजय मिळवला. सार्वजनिक बांधकाम मंत्री व पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली या पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवार उभे केले होते. नांदेडमधील या पोटनिवडणुकीतही महाविकास आघाडीचा प्रभाव जाणवला असून भाजपाला फटका बसला आहे.
जिल्ह्यातील नांदेड-वाघाळा महानगर पालिकेच्या प्रभाग क्र. 11 (ड) मध्ये काँग्रेसचे अब्दुल गफ्फार अब्दुल सत्तार 1866 मतांनी, धर्माबाद नगर परिषदेच्या वार्ड क्र. 2 (अ) मध्ये काँग्रेसच्या कविता नारायण बोलमवाड 229 मतांनी तर व़ार्ड क्र. 4 (अ) मधून काँग्रेसचेच सायारेड्डी पोशट्टी गंगाधरोड 466 मतांनी विजयी झाले आहेत. तसेच, हिमायतनगर नगर परिषदेच्या वार्ड क्र. 13 मधून काँग्रेसच्या अजगरी बेगम अ. रहेमान 341 मतांनी, नायगाव नगर पंचायतच्या वार्ड क्र. 1 मध्ये काँग्रेसचे बोईनवाड हणमंत आनंदराव 207 मतांनी विजयी झाले आहेत. बिलोली नगर परिषदेच्या वार्ड क्र. 5 (अ) मध्ये काँग्रेसचे उमेदवार लक्ष्मण शंकरराव शेट्टीवार यांना 70 मतांनी पराभव स्वीकारावा लागला आहे.
महाविकास आघाडी झाल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील पहिल्याच पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाचा ६ पैकी ५ जागांवर दणदणीत विजय... भाजपचा धुव्वा...
— Ashok Chavan (@AshokChavanINC) February 7, 2020
विजयी उमेदवारांचे अभिनंदन आणि मतदारांचे मनःपूर्वक आभार...#महाविकासआघाडी#JaiHopic.twitter.com/rCsecg3K4o
राज्यात महाविकास आघाडी झाल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील ही पहिलीच पोटनिवडणूक होती. या निवडणुकीत भाजपला एकही जागा जिंकता आली नाही. काँग्रेसने 5 जागांवर विजय मिळवला असून उर्वरीत एका जागेवर अपक्ष उमेदवाराच्या गळ्यात विजयाची माळ पडली आहे. काँग्रेसला मिळालेल्या या यशामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा प्रभाव राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमध्येही होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.