नांदेड - जिल्ह्यातील महानगरपालिका, नगर परिषद व नगर पंचायतच्या पोटनिवडणुकीत 6 पैकी 5 जागा जिंकून काँग्रेसने सहजच विजय मिळवला. सार्वजनिक बांधकाम मंत्री व पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली या पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवार उभे केले होते. नांदेडमधील या पोटनिवडणुकीतही महाविकास आघाडीचा प्रभाव जाणवला असून भाजपाला फटका बसला आहे.
जिल्ह्यातील नांदेड-वाघाळा महानगर पालिकेच्या प्रभाग क्र. 11 (ड) मध्ये काँग्रेसचे अब्दुल गफ्फार अब्दुल सत्तार 1866 मतांनी, धर्माबाद नगर परिषदेच्या वार्ड क्र. 2 (अ) मध्ये काँग्रेसच्या कविता नारायण बोलमवाड 229 मतांनी तर व़ार्ड क्र. 4 (अ) मधून काँग्रेसचेच सायारेड्डी पोशट्टी गंगाधरोड 466 मतांनी विजयी झाले आहेत. तसेच, हिमायतनगर नगर परिषदेच्या वार्ड क्र. 13 मधून काँग्रेसच्या अजगरी बेगम अ. रहेमान 341 मतांनी, नायगाव नगर पंचायतच्या वार्ड क्र. 1 मध्ये काँग्रेसचे बोईनवाड हणमंत आनंदराव 207 मतांनी विजयी झाले आहेत. बिलोली नगर परिषदेच्या वार्ड क्र. 5 (अ) मध्ये काँग्रेसचे उमेदवार लक्ष्मण शंकरराव शेट्टीवार यांना 70 मतांनी पराभव स्वीकारावा लागला आहे.