- विशाल सोनटक्के
नांदेड : राज्यात सरकार स्थापन करण्याच्या दिशेने सुरू असलेले प्रयत्न अंतिम टप्प्यात आहेत. सोमवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात निर्णायक चर्चा होईल. मात्र राज्यात महाशिवआघाडी उभी राहू नये यासाठी भाजप कसून प्रयत्न करीत असल्याचे सांगत राज्यावर पुन्हा निवडणूक लादण्याचा प्रयत्न भाजपतर्फे केला जात असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला.
चव्हाण यांनी शुक्रवारी ‘लोकमत’शी संवाद साधला. अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक व मानसिकदृष्ट्या कोलमडलेला आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची गरज आहे. अतिवृष्टीमुळे हाता-तोंडाशी आलेले खरिपाचे पीक वाया गेले आहे. वेळेत मदत मिळाली नाही तर रबी हंगामही वाया जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्वरेने नुकसानभरपाई तसेच मदत मिळावी, यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार असल्याची माहितीही चव्हाण यांनी दिली. मराठवाड्याकडे तर कोणाचे लक्षच नाही. मागील ११ महिन्यांत एकट्या नांदेड जिल्ह्यात १०० शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. मागील तीन वर्षांत मुख्यमंत्री अनेकदा नांदेड तसेच मराठवाड्यात येऊन गेले. मात्र त्यांना शेतकऱ्यांबाबत कसलाच कळवळा नसल्याची टीका त्यांनी केली.
राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्रित सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. चर्चा सकारात्मक असून शिवसेना, राष्ट्रवादी यांचा प्रत्येकी अडीच वर्षे मुख्यमंत्री आणि काँग्रेसने सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यास उपमुख्यमंत्री पद काँग्रेसकडे राहण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. मात्र काँग्रेसने थेट सत्तेत सहभागी व्हायचे की नाही? याचा अंतिम निर्णयही काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी याच घेतील, असेही अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.
घाईघाईने राष्ट्रपती राजवट लागू केलीसरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेला पुरेसा अवधी दिला नाही. राष्ट्रवादीला दिलेली वेळ संपण्यापूर्वीच राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीचा प्रस्ताव पाठविला. खरे तर सत्तास्थापनेसाठी पुरेसा वेळ देण्याची आवश्यकता होती. मात्र शेवटी तिघे मिळून एकत्रित येत आहेत. हे लक्षात आल्यानंतर घाईघाईने राष्ट्रपती राजवट लागू केली. सध्या कोणालाच निवडणूक नको आहे. राज्याला ती परवडणारीही नाही. परंतु इतरांचे सरकार सत्तेत येऊ नये. यासाठी आघाडीच्या सत्तास्थापनेत अडथळे आणण्याचे त्यांनी प्रयत्न सुरू केल्याचे अशोक चव्हाण म्हणाले.