थापेबाजीमुळेच भाजपाची विश्वासार्हता संपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 01:00 AM2019-03-04T01:00:45+5:302019-03-04T01:02:43+5:30
मी शब्द दिल्याप्रमाणे शहरातील ३८ कोटींच्या विकासकामे प्रारंभाने अर्धापूर शहराचा चेहरामोहरा बदलून जाणार असल्याचे प्रतिपादन खा़अशोकराव चव्हाण यांनी केले.
अर्धापूर : मी शब्द दिल्याप्रमाणे शहरातील ३८ कोटींच्या विकासकामे प्रारंभाने अर्धापूर शहराचा चेहरामोहरा बदलून जाणार असल्याचे प्रतिपादन खा़अशोकराव चव्हाण यांनी केले. जनतेला दिलेल्या थापामुळे भाजपाच्या हातातून तीन राज्ये गेली. रमण गए, राणी गई, गए शिवराज मामा-अब जल्दही बंद होगा चाय वाले का ड्रामा़़़ अशा शब्दात विरोधकांवर प्रहार करीत पुलवामा घटनेबाबतीत भाजपावाल्यांनी राजकारण करु नये. पाकिस्तानच्या भूमीवर मिळविलेले यश हे सैनिकांचे असल्याचेही सुनावले.
२ मार्च रोजी नगरपंचायत अंतर्गत पाणीपुरवठा योजना, घरकुल योजना, वाचनालय, व्यापारी संकुल, केशवराज मंदिर सुशोभिकरण, सी़सी़रस्ता अशा विविध विकासकामाचा प्रारंभ व बौद्ध विहाराचा लोकार्पण सोहळा खा़अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता.
अध्यक्षस्थानी चेअरमन गणपतराव तिडके होते. मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी प्रास्ताविकपर भाषणात शहरातील विविध विकासकामे व योजनांविषयी माहिती दिली. खा. अशोकराव चव्हाण म्हणाले की, राज्यात अजून कर्जमाफी चालूच आहे. दुधाला, भाजीपाल्याला भाव नसल्याने तो रस्त्यावर फेकून द्यावा लागत आहे. आरक्षणाच्या बाबतीत धनगर समाजाच्या तोंडाला पाने पुसल्याचा थेट आरोपही अशोकराव चव्हाण यांनी यावेळी केला. येणाऱ्या निवडणुकीत महाआघाडी शिवसेना-भाजपाचा एकजुटीने पराभव करणार असून देशातील वातावरण बदलले आहे. याचा प्रत्यय लवकरच दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष गोविंदराव शिंदे, तालुकाध्यक्ष बालाजी गव्हाणे, भोकर तालुकाध्यक्ष जगदीश पाटील, मुदखेड तालुकाध्यक्ष उद्धवराव पवार, संजय लहानकर, पप्पू पाटील कोंढेकर, जि.प. सभापती शिला निखाते, जि.प.सदस्य संगीता अटकोरे, सभापती मंगल स्वामी, शमीम अब्दुला, जहागीरदार, नगराध्यक्षा प्रणिता सरोदे, आखतरउल्ला बेग, डॉ़ पल्लवी लंगडे, काँग्रेस शहराध्यक्ष राजू शेट्टे, पंडितराव लंगडे, नासेर खान, मुसव्वीर खतिब व सर्व नगरसेवक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संतोष देवराये यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जि.प.सदस्य धर्मराज देशमुख यांच्या बंधुचे नुकतेच निधन झाल्याने त्यांच्या घरी अशोकराव चव्हाणांनी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने अर्धापूर शहरात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी केली.