भाजपामुळे देशात अराजकतेची स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 12:33 AM2019-04-13T00:33:52+5:302019-04-13T00:36:52+5:30
भाजपच्या कार्यकाळात देशात मोठ्या प्रमाणात अराजकता निर्माण झाली. सर्वच स्तरांत नैराश्य पसरले असून येणाऱ्या काळात देशाला मोठे नुकसान सहन करावे लागणार
नांदेड : भाजपच्या कार्यकाळात देशात मोठ्या प्रमाणात अराजकता निर्माण झाली. सर्वच स्तरांत नैराश्य पसरले असून येणाऱ्या काळात देशाला मोठे नुकसान सहन करावे लागणार असल्याचे मत खा. कुमार केतकर यांनी नांदेडमध्ये व्यक्त केले.
जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात खा. केतकर यांची पत्रकार परिषद झाली. ते म्हणाले, २०१४ मध्ये देशवासियांनी मोदींच्या हातात सत्ता दिली. मात्र जनतेचा भ्रमनिरासही झाला. ज्या घोषणा सत्ता येण्यापूर्वी भाजपाने केल्या होत्या. त्यातील किती योजनांची अंमलबजावणी झाली हा संशोधनाचा विषय आहे. दुसरीकडे देशात सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आले. अराजकता निर्माण झाली. सरकारविरोधी बोलणे म्हणजे देशद्रोह ठरविण्यात आला. मोदी आणि अमित शहा यांनी सर्व नियम व स्वातंत्र्य मोडीत काढत हुकूमशाही आणली आहे. या दोघांनाही संसदेचा अभ्यास आणि अनुभव नसल्याचेही केतकर म्हणाले. देशात रोजगाराचा प्रश्न ‘जैसे थे’आहे. नोटाबंदीमुळे सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. ज्या काळ्या पैशाच्या गोष्टी भाजपाने केल्या होत्या. तो काळा पैसा आलाच नाही. उलट नोटाबंदीच्या निर्णयाने अनेकांचा रोजगार हिरावला. इंदिरा गांधी यांच्या काळात संसदेचे सभागृह १६० ते १७० दिवस चालायचे. मोदींच्या काळात मात्र ते ६० ते ७० दिवसच चालत आहे. मोदींना अधिवेशन नको असते. २०१९ ची लोकसभा निवडणूक ऐतिहासिक ठरणार आहे. २०१९ च्या निकालानंतर कोणत्याही पक्षाचा पंतप्रधान विराजमान झाला तरी त्याला येणारे धोके झेलावे लागतील, ंअसेही ते म्हणाले.
- काँग्रेसने २०१९ च्या निवडणुकीसाठी घोषित केलेला जाहीरनामा नेहमीपेक्षा वेगळा आहे. हा जाहीरनामा तयार करताना विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांची मते जाणून घेण्यात आली आहेत. सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून जाहीरनामा तयार केला आहे. काँग्रेसचा हा जाहीरनामा म्हणजे ख-या अर्थाने जनतेचा जाहीरनामा आहे, असे सांगत काँग्र्रेसची सत्ता आल्यास सर्वसामान्यांना दिलासा मिळेल.