लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : किनवट तालुक्यातील उमरी तांडा येथील रुपाली संजय राठोड आणि पुणे जिल्ह्यातील तारडोली येथील चंद्रकांत माणिक कदम हे दोघे शुक्रवारी नांदेड येथील नोंदणी कार्यालयात विवाहबद्ध झाले. रुपाली आणि चंद्रकांत दोघेही उच्चशिक्षित असून त्यांनी हा आंतरजातीय विवाह केला आहे.किनवट तालुक्यातील उमरी तांडा येथील रुपाली संजय राठोड हिने पुण्याच्या वाडीया महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केले असून सध्या ती ठाणे येथे टेलिफोन आॅपरेटर म्हणून कार्यरत आहे. तर पुणे जिल्ह्यातील तारडोली येथील चंद्रकांत माणिक कदम हेही उच्चशिक्षित असून सध्या ते मुंबई येथील राज्य सहकारी बँकेत नोकरीस आहेत. दोघेही अंध असतानाही त्यांनी मोठ्या हिमतीने शिक्षण घेतले असून आज ते चांगल्या नोकरीतही आहेत. मागील काही दिवसांपासून या दोघांच्या घरचे विवाहासाठी पुढाकार घेत होते. वधू रुपाली राठोड हिचे काका कॉ. सुनील राठोड यांनी या दोघांचा विवाह नांदेड येथे नोंदणी पद्धतीने करण्यासाठी पुढाकार घेतला.या अनुषंगाने कॉ. गंगाधर गायकवाड यांच्याशी त्यांनी चर्चा केली आणि त्यानंतर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात वधू-वरांची नावे नोंदविण्यात आली. शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास मोजकी मित्रमंडळी आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत अतिशय आनंदात हा विवाह सोहळा पार पडला. विवाह दुय्यम निबंधक कार्यालयातील विवाह अधिकारी भिसे यांनी वधू-वरांकडून शपथ वाचन करुन घेतली आणि विवाह प्रमाणपत्र देऊन नवदाम्पत्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थितांना पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. विवाह सोहळ्याला नीलाबाई राठोड, अरुणाताई राठोड, रवींद्र राठोड, आदित्य राठोड यांच्यासह नातेवाईक, मित्रमंडळी तसेच कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
अंध वधू-वरांनी तोडल्या जातीच्या श्रृंखला; नोंदणी पद्धतीने विवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 12:55 AM
रुपाली संजय राठोड आणि पुणे जिल्ह्यातील तारडोली येथील चंद्रकांत माणिक कदम हे दोघे शुक्रवारी नांदेड येथील नोंदणी कार्यालयात विवाहबद्ध झाले.
ठळक मुद्देदोघेही उच्चशिक्षित : सोहळ्याला नातेवाईकांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती