नांदेड : दक्षिण मध्य रेल्वेच्यानांदेड विभागाने २५ एप्रिल रोजी लाइन ब्लॉक घेतला आहे. परिणामी नांदेड ते मनमाड या मार्गावरील रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत होणार असून, तपोवन, पुणे एक्स्प्रेस, नगरसोल यासह इतर अनेक गाड्या उशिराने धावणार आहेत.
परभणी जिल्ह्यातील सेलू, ढेनगळी पिंपळगाव, मानवत रोड या रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे मार्ग दुरुस्तीचे काम २५ एप्रिल रोजी केले जाणार आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने पाच तासांचा लाइन ब्लॉक घेतला घेतला आहे. या कामामुळे मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेस (१७६१७) दोन तास १५ मिनिटे, नांदेड- पुणे एक्स्प्रेस (१७६३०) ५० मिनिटे, काचीगुडा-नगरसोल एक्स्प्रेस (१७६६१) तीन तास १० मिनिटे आणि नगरसोल-नरसापुर एक्स्प्रेस (१२७८८) दीड तास उशिराने धावणार आहे. याशिवाय २६ एप्रिल रोजी धर्माबाद येथून सकाळी ४ वाजता सुटणारी धर्माबाद- मनमाड मराठवाडा एक्स्प्रेस (१७६८८) एक तास उशिराने सुटेल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
सेलू तालुक्यातील सेलू, डेंगळे पिंपळगाव, मानवत रोड या रेल्वे मार्गाचे काम मागील एक महिन्यापासून सुरू आहे. प्रत्येक आठवड्यात हे काम करण्यासाठी लाइन ब्लॉक घेतला जातो. त्यामुळे महिनाभरापासून या मार्गावरील रेल्वे वाहतूक प्रत्येक आठवड्यात एक दिवस विस्कळीत होत आहे. त्याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे.