फेब्रुवारीपासून जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाल्याने रुग्णसंख्या झपाट्याने वाढली आहे. त्याचा परिणाम रक्तपेढ्यांवर दिसून आला. फेब्रुवारी महिन्यात शिवजयंती निमित्त आयोजित रक्तदान शिबिरामुळे मार्च महिन्यातील काही दिवस गेले. त्यानंतर शिबिरांना ब्रेक लागला. त्यात काही युवकांनी स्वयंस्फूर्तपणे ब्लड बँकेत जाऊन रक्तदान करण्याची मोहीम चालविली. परंतु, मागील काही दिवसात लाॅकडाऊन लागल्यापासून त्यास खीळ बसली आहे. आजघडीला जवळपास सर्वच रक्तपेढ्यांमध्ये तुरळक प्रमाणात रक्तसाठा आहे. दरम्यान, कोविड लसीकरण मोहिमेंतर्गत ४५ वर्षांवरील सर्वांनाच लसीकरण सुरू झाले. ज्यांनी लस घेतली अशांना २८ दिवसांपर्यंत रक्तदान करता येत नसल्याने त्याचाही परिणाम रक्त संकलनावर होऊ लागला. त्यामुळे सद्यस्थितीत चार दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा जिल्ह्यातील प्रमुख रक्तपेढ्यांमध्ये उपलब्ध असल्याची माहिती रक्तपेढ्यांकडून मिळाली.
शासकीय रक्तपेढी
फेब्रुवारी, मार्च महिन्यात जिल्ह्यात कोविड रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक रक्तदाते स्वत:हून रक्तदान करण्यास टाळत असल्याचे दिसत आहे. शासकीय रक्तपेढीच्या माध्यमातून रक्तदान शिबिरे घेण्यात येत असल्याने काही प्रमाणात रक्ताचा साठा उपलब्ध आहे. मात्र, हा साठा तीन ते चार दिवस पुरेल एवढाच आहे. येत्या काळात लसीकरणाचा ही प्रभाव रक्त संकलनावर दिसण्याची शक्यता आहे. परंतु, रक्तदात्यांनी लस घेण्यापूर्वीच रक्तदान करावे, असे आवाहन डॉ. प्रसाद बोरूळकर यांनी केले आहे.
श्री गुरूगोविंदसिंघजी ब्लड बँक
जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासूनच रक्त संकलनावर परिणाम झाला होता. परंतु, योग्य नियोजन आणि रक्तदात्यांची असलेल्या संपर्कामुळे साठ ते सत्तर बॅगचा साठा असून तो १२ एप्रिलपर्यंत पुरेल. त्यानंतर जवळपास सातशे बॅग रक्तसंकलन होईल, अशा शिबिराचे नियोजन केले आहे. रूग्णांच्या नातेवाईकांनी देखील रक्त बॅग घेताना एखादा डोनर सोबत आणावा, जेणेकरून इतरांना अडचण जाणणार नाही. - डॉ.प्रसाद बोरूळकर, अध्यक्ष श्री गुरूगोविंदसिंघजी ब्लड बँक, नांदेड.
नांदेड ब्लड बँक
नांदेड ब्लड बँकेत जवळपास दोन दिवस पुरेल एवढा रक्तसाठा असून शिबिराचे नियोजन केले जाते. लाॅकडाऊनमुळे रक्तदान शिबिरे रद्द झाल्याने हा तुटवडा भासत आहे. येत्या काळात रक्तदान शिबिरे आणि स्वयंस्फूर्तपणे रक्तदान करणाऱ्यांशी संपर्क साधून रक्तसाठा वाढविण्यात येईल. रूग्णांच्या नातेवाईकांना अडचणी सोडविण्याचा रक्त वेळेत उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असतो. - डाॅ. गणेश बोंढारे, नांदेड ब्लड बँक, नांदेड.