गावात भंडारा अन् चोरट्यांनी साधला डाव
नांदेड- भोकर तालुक्यातील थेरबन येथे गावात भंडाऱ्याचा कार्यक्रम सुरू असल्याची संधी साधत चोरट्याने घर फोडून रोख ५७ हजार रुपये लंपास केले. ही घटना २ जानेवारी राेजी घडली.
थेरबन येथील महादेव मंदिरात २ जानेवारी रोजी भंडारा ठेवण्यात आला होता. विठ्ठल दिगंबर नलबे हे घराला कुलूप लावून भंडाऱ्यासाठी गेले होते. याच दरम्यान चोरट्याने कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला. यावेळी रोख ५७ हजार रुपये लंपास केले. या प्रकरणात भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
खंजर घेऊन फिरणाऱ्याला पकडले
नांदेड- शहरातील इतवारा भागात हातात खंजर घेऊन फिरणाऱ्या एकाला पोलिसांनी पकडले आहे. २ जानेवारी रोजी ही कारवाई करण्यात आली. आरोपी सार्वजनिक रस्त्यावर खंजर घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या प्रकरणात इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
आलोने यांना तेली समाज भूषण पुरस्कार
नांदेड- तेली समाज सेवाभावी संस्थेचे माजी अध्यक्ष शेषराव आलोने यांना तेली समाज भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. यावेळी खा. प्रताप पाटील चिखलीकर, राम सावकार सूर्यवंशी, दिलीपराव सोनटक्के, बालाजी बनसोडे, लक्ष्मणराव क्षीरसागर, गणेशराव सूर्यवंशी, माधव परगेवार, नारायणराव दावलबाजे यांची उपस्थिती होती.