स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा (बाबूजी) यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त ‘लोकमत रक्ताचं नातं ’हा रक्तदान महायज्ञाचा शुभारंभ शुक्रवारी झाला. तद्नंतर सोमवारी गुरुद्वारा परिसरात रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात स्वयंस्फूर्तपणे सहभागी झालेल्या सरदार रणविंदर सिंग हुकुमचंद यांनी सर्वांचेच लक्ष वेधले. त्यास त्यांची पगडी अन् रुबाबदार व्यक्तिमत्त्व कारणीभूत ठरले. सरदार रणविंदर सिंग हे नेहमीच भ्रमंतीवर असतात. ते महाराष्ट्रात आठ महिने अन् चार महिने परराज्यातील देवस्थानांवर मुक्काम करतात. त्यांचा हा संपूर्ण प्रवास दुचाकीवर असतो, हे विशेष. वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांना कुठलाही आजार अथवा गोळी सुरू नसल्याचे ते अभिमानाने सांगतात. नांदेडमध्ये मागील चाळीस वर्षांपासून ते नियमितपणे गुरुद्वारामध्ये दसरा-दिवाळीनिमित्त निघणाऱ्या जुलुसमध्ये सहभागी होतात. त्यावेळी त्यांची सर्वाधिक उंच आकाराची पगडी चर्चेचा अन् सर्वसामान्यांसाठी कुतूहलाचा विषय असतो. आजपर्यंत सरदार रणविंदर सिंग यांनी हिमाचलप्रदेश, दिल्ली, उज्जैन, कुंभमेळा आदी ठिकाणी धार्मिक कार्यक्रमानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदान केले असल्याचे सांगितले.
चौकट
सैन्यात राजस्थानमध्ये कार्यरत असलेले अंकुश पाडदेकर हे सुटीसाठी नांदेडात आले असता त्यांनीदेखील रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवला.