किनवट : पैशाच्या देण्या-घेण्यावरुन बोधडी बु़ येथील ४५ वर्षीय व्यक्तीला मारहाण करून पाण्यात बुडवून ठार मारल्याची घटना २९ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता सावरी शिवारातील वाघिणीच्या कुंडात घडली होती़ याप्रकरणी ३ डिसेंबर रोजी मयताच्या भावाच्या फिर्यादीवरून किनवट पोलिसांत चार जणाविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला.मयत सुभाष प्रभू जायभाये (४५ रा़ बोधडी (बु)) यांना २९ नोव्हेंबर रोजी संशयित आरोपी गंगाधर मधुकर लहाने, संदीप गंगाधर लहाने, नामदेव गोरबा जोंधळे व अंगत निवृत्ती मुसळे (रा़ सर्व बोधडी बु़) यांनी कामाला जायचे आहे, असे म्हणून सोबत नेले. यावेळी आरोपी व मयताचा पैशाच्या देण्या-घेण्यावरुन वाद झाला. याच कारणावरुन आरोपींनी मयताला सावरी येथील वाघिणीच्या कुंडाच्या डोहात बुडवून ठार मारले, अशी फिर्याद मयताच्या भावाने किनवट पोलिसांत दिली़घटना घडल्यानंतर किनवट पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती़ मात्र मयताच्या कपाळावर, गळ्यावर, डोळ्यावर जखमा होऊन रक्त होते व पाठीवर मारहाण केल्यामुळे मुक्का मार लागून पाठ लालसर झाली होती़ ठार मारून कुंडामध्ये बुडाला, असे भासवून पोटावर करदोड्याने पाणीबुडीची मोटर बांधून ठेवली होती, असा संशय घेत मयताच्या भावाने माझ्या भावाला देण्या-घेण्याच्या कारणावरून ठार मारले, अशी फिर्याद सोमवारी दिल्याने त्यावरून किनवट पोलिसांनी चार जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. तपास पोलीस निरीक्षक दिलीप तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय गणेश चिते करीत आहेत़
पैशाच्या देण्या-घेण्यावरून कुंडात बुडवून एकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 1:07 AM