मुखेड ( नांदेड ) : शहरा लगत असलेल्या मोतिनदीच्या पुरात वाहून गेलेले राठोड कुटूंबातील दोन जणांची मृतदेह आज सकाळी ८ वाजता सापडले. भगवानराव राठोड ( ६५ ) व संदीप राठोड ( ३८ ) अशी मृतांची नावे आहेत. दोघांचे मृतदेह बेरळी शिवारात सापडले आहेत.
नांदेड जिल्ह्यातील ८० महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. गावालगत असलेल्या नदी-नाल्यांसह ओढ्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. मुखेड शहरापासून जवळ असलेल्या मोती नाल्यात कार वाहून गेल्याची घटना सकाळी ११ वाजेच्या दरम्यान घडली. या कारमध्ये आमदार डॉ. तुषार राठोड यांचे चुलतभाऊ तथा माजी आमदार किशन राठोड यांचा मुलगा भगवान राठोड आणि त्यांचा मुलगा संदीप राठोड हे दोघे पुरात वाहून गेले. या गाडीतील चालक उद्धव देवकत्ते यांनी पुरात वाहत असताना झाडाचा आसरा घेत स्वतःचे प्राण वाचविले. दरम्यान, आज सकाळी बेरळी शिवारात दोघांचे मृतदेह आढळून आले. त्यांच्यावर आज दुपारी २ वाजता कमळेवाडी ( ता.मुखेड ) येथे अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती आहे.
हेही वाचा - Video : थरारक ! नदीच्या पुरात जीप वाहून गेली; एकाने झाडावर चढून वाचवला जीव
पालकमंत्र्यांच्या जिल्हा प्रशासनाला सतर्कतेच्या सुचनानांदेड जिल्ह्यात सोमवार सायंकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदी, नाले तुडुंब भरून वाहत असून, अनेक तालुक्यांमध्ये पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. ठिकठिकाणी शेतीत व लोकवस्तीत पाणी घुसल्याची माहिती मिळते आहे. पुरामुळे नागरिक अडकून पडल्याच्याही घटना समोर येत आहेत. रस्ते खचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. प्रामुख्याने गोदावरीच्या काठावरील गावांमध्ये परिस्थिती गंभीर आहे. संततधार पाऊस आणि येवा वाढल्याने विष्णुपुरी प्रकल्पाचे १२ दरवाजे उघडण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर संकटग्रस्तांना तातडीने मदत करण्यासाठी कृतीदल स्थापन करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. संकटात फसलेल्या नागरिकांना मदत करण्याला पहिले प्राधान्य आहे. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर व पाणी ओसरल्यानंतर जिल्ह्यातील नुकसानाचे नेमके चित्र स्पष्ट होईल, असेही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. जिल्ह्यातील पावसाची परिस्थिती आणखी काही तास अशीच राहणार असल्याचा इशारा वेधशाळेने दिला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असेही आवाहन त्यांनी केले आहे.