अर्धापूर ( नांदेड ) : असना नदीच्या पुरात गुरुवारी सायंकाळी सालगड्याचा मुलगा बैलगाडीसह वाहून गेला होता. तब्बल ४६ तासांनंतर मुलाचा मृतदेह बंधाऱ्यापासून ३ किमी अंतरावर प्रशासनाच्या पथकास सापडला. सुदर्शन इरबाजी झुंजारे असे मृताचे नावे आहे. मृतदेह पिंपळगाव व नांदला दिग्रस शिवारात आढळून आला.
मुसळधार पावसाने गुरुवारी असना नदीला पूर आला. सायंकाळी पाण्याच्या प्रवाह वाढत असताना सुदर्शन चारा घेऊन बैलगाडीने घराकडे परतत होता. पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तो बैलगाडीसह नदीत वाहून गेला. काही वेळाने तेथे दोन बैल मृतावस्थेत आढळले. प्रशासनाने तत्काळ धाव घेऊन मदत कार्य राबवले. मात्र, सुदर्शन सापडला नव्हता. अखेर आज दुपारी २.३० च्या सुमारास नदी परिसरातील नांदला-दिग्रस शिवारात त्याचा मृतदेह आढळून आला.
यावेळी तहसीलदार उज्वला पांगरकर, नायब तहसीलदार मारोतराव जगताप, ग्रामसेवक अनिल गिते, मदन देशमुख, पोलीस प्रशासनाचे कर्मचारी, सरपंच कपिल दुधमल, उध्दवराव कल्याणकर, संतोष कल्याणकर, प्रमोद कल्याणकर, मृत्युंजय दुत, अजय देशमुख ग्रामस्थ, जीवरक्षक दलाचे कर्मचारी यांनी मदतकार्य केले.