नांदेड : बनावट एनए, लेआऊट आणि इतर कागदपत्रांचा वापर करून शहरात नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यातच तब्बल १८६ बाेगस दस्तनोंदणी करण्यात आल्या होत्या. चौकशी समितीच्या अहवालानंतर तब्बल महिनाभरानंतर या प्रकरणात आता शिवाजीनगर आणि विमानतळ पोलीस ठाण्यात ८० जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्यामुळे भूमाफियांचे धाबे दणाणले आहे. ‘लोकमत’ने या प्रकरणाचा पाठपुरावा केला होता.
शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयात नोव्हेंबर २०२१ ते डिसेंबर २०२२ या काळात दस्तनोंदणी झालेली ६५९ प्रकरणे संशयास्पद होती. या प्रकरणांत जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटणकर यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. ईटणकर यांच्या आदेशावरून चौकशी समिती स्थापन करण्यात आली.
या समितीने १८६ प्रकरणांत गैरव्यवहार झाल्याचे नमूद केले. त्यानंतर फेरचौकशी करण्यात आली. त्यात १०५ प्रकरणांत बनावट कागदपत्रांचा आधार घेण्यात आला होता, तर ८१ प्रकरणांत संबंधित दुय्यम निबंधकांनी विहीत कार्यपद्धतीचा अवलंब केला नसल्याचे स्पष्ट झाले होते. याबाबतचा अहवाल आल्यानंतर गुन्हे दाखल करण्यास मात्र टाळाटाळ करण्यात आली. तब्बल महिनाभरानंतर बुधवारी रात्री शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ६७ आणि विमानतळ पोलीस ठाण्यात १३ अशा ८० जणांवर बोगस कागदपत्रांचा वापर करून दस्तनोंदणी केल्या प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यात सहाय्यक दुय्यम निबंधक मालती सुस्ते, राजेश मोकाटे यांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे भूमाफियांचे धाबे दणाणले आहेत.
दरम्यान, या प्रकरणात खरेदी करणाऱ्यांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. परंतु, विक्री करणारे अद्यापही मोकळेच आहेत. त्यांनी कोणाकडून ही बनावट कागदपत्रे तयार केली, तसेच दस्तनोंदणी कार्यालयातील कोणकोणत्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा मलिदा लाटला याचा पोलिसांकडून आता तपास करण्यात येणार आहे. परंतु नागरिकांवर गुन्हे दाखल केले असले तरी झारीतील शुक्राचार्य मात्र अद्यापही मोकळेच आहेत. त्यांच्यावर प्रशासकीय कारवाईचे आदेश असले तरी ही कारवाई किती पारदर्शपणे होईल, हे मात्र सांगता येत नाही. परंतु या प्रकरणात मोठे रॅकेट असण्याची दाट शक्यता आहे.
गुन्हे दाखल तपास सुरूबनावट कागदपत्रांचा वापर करून दस्तनोंदणी करण्यात आली होती. शासकीय अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर आणि विमानतळ पोलीस ठाण्यात ८० जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास संबंधित अधिकारी करत आहेत. या प्रकरणात माझेही लक्ष आहे. तपासात आणखी काही बाबी पुढे येऊ शकतात, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक चंद्रसेन देशमुख यांनी दिली.