कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर मार्च, एप्रिल व मे महिन्यात सुरू होता. जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी ई-पास बंधनकारक करण्यात आल्याने पोलीस अधीक्षक कार्यालयात ई-पाससाठी अर्जांची संख्या वाढली. त्यात उपचारासाठी तसेच काहींनी नातेवाईकांच्या भेटीचे कारण, तर कोणी सहलीवर जाण्यासाठी ई-पासची गरज असल्याचे सांगितले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने जाहीर केलेल्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन कार्यरत आहे. दुसऱ्या लाटेच्या काळात अनेकांना जिल्हाबाहेर प्रवास करायचा होता.
त्यासाठी ई-पास मिळावा, यासाठी नांदेड जिल्ह्यातील तब्बल २५ हजार जणांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे कर्ज दाखल केले आहेत. सध्या कोरोनाचे रुग्ण कमी होत असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे अनेकांनी पावसाळी पर्यटनासाठी नियोजन केले आहे. काही जिल्ह्यात मात्र अद्याप लॉकडाऊनच आहे. त्यामुळे अशा ठिकाणी जाताना ई-पासची गरज पडणार आहे.
टाळेबंदीने कंटाळलेल्या नागरिकांची धडपड
-मार्चपासून घरातच कोंडून पडलेल्या नागरिकांना आता बाहेर जाण्याची घाई झाली आहे. यासाठी अनेकांनी सहलीवर जाण्याचे नियोजन केले आहे. लॉकडाऊन काळात लग्न झालेल्या जोडप्यांनाही सहलीवर जायचे आहे. त्यासाठी त्यांनी अर्ज केला आहे.
- अनेकांनी ई-पास अर्जात वैद्यकीय कारण दिले असून, जवळच्या नातेवाईकांचे लग्न, नातेवाईकांची भेट आदी कारणे दिली आहेत. मात्र किरकोळ कारणासाठी केलेले अर्ज रद्द करण्यात आले आहेत.
- लग्नानंतर फिरायला जाणे, नातेवाईकांच्या भेटीला जाणे, या कारणासोबतच मुलांच्या शैक्षणिक कामासाठी जात असल्याचेही कारणे अर्जात स्पष्ट केली आहेत. अनेकांनी कागदपत्रांची पूर्तताच केली नाही.
बहुतांश अर्जदारांचे वैद्यकीय कारण
- कोरोना काळात जिल्ह्याबाहेर प्रवासासाठी अनेकांनी ई-पाससाठी आपले अर्ज दाखल केले होते. यातील अनेकांच्या अर्जात वैद्यकीय कारणांचा उल्लेख आढळला. विशेष म्हणजे नांदेडहून हैदराबादकडे जाणाऱ्या नागरिकांची मोठी संख्या होती. अनेकांनी वैद्यकीय उपचाराचे कारण पुढे केले. सर्वाधिक अर्ज वैद्यकीय कारणाचे आहेत; तर उर्वरित कारणात लग्न, अंत्यविधीचे कारण दिले आहे. आवश्यक कारणांनाच संबंधित कार्यालयाने मंजुरी दिली आहे.
अत्यावश्यक कारणासाठी ई-पास
- ई-पाससाठी जिल्ह्यातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात अर्ज आले आहेत. अनेक अर्जांत किरकोळ कारणे होती; तर अनेकांच्या अर्जात त्रुटी होत्या. अनेकांच्या अर्जात फिरायला जाणे, असा उल्लेख असल्याने हे अर्ज रद्द करावे लागले. अत्यावश्यक कारण असलेल्या अर्जांनाच परवानगी दिली आहे. - प्रमोद शेवाळे, पोलीस अधीक्षक, नांदेड