तिकीट बुकिंगच्या वादातून शिक्षकाला मारहाण
नांदेड- मुखेड शहरातील एका ट्रॅव्हल्स कंपनीच्या कार्यालयाबाहेर तिकीट बुकिंगच्या कारणावरुन शिक्षक आणि त्यांच्या चुलत भावाला मारहाण करण्यात आली. ही घटना १७ मार्च रोजी घडली.
सुमित शेषराव नाईक हे १७ मार्च रोजी मुखेड शहरातील गोदावरी ट्रॅव्हल्सच्या ऑफिससमोर होते. यावेळी तिकीट बुकिंग करण्यावरुन त्यांच्याशी आरोपीने वाद घातला. त्यानंतर नाईक आणि त्यांच्या चुलत भावाला मारहाण करण्यात आली. या प्रकरणात नाईक यांच्या तक्रारीवरुन मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सपोनि केंद्रे हे करीत आहेत.
ग्रामपंचायतीच्या सभेत गोंधळ
नांदेड- कंधार तालुक्यातील उस्माननगर येथील ग्रामपंचायतीमध्ये मासिक सभा सुरु असताना माझ्या घराजवळील नालीचे बांधकाम कधी सुरु करता म्हणून काही जणांनी गोंधळ घातला. यावेळी ग्रामपंचायतीच्या साहित्याची मोडतोड करण्यात आली. या प्रकरणात उस्माननगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
१८ मार्च रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास उस्माननगर ग्रामपंचायतीमध्ये मासिक सभा सुरु होती. यावेळी आरोपी या ठिकाणी आला. त्याने माझ्या घराजवळील नालीचे बांधकाम कधी करता म्हणून वाद घातला. शिवीगाळ करीत शासकीय कार्यालयातील प्रिंटर आणि इतर साहित्य फेकून दिले. यामध्ये शासनाचे १५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणात ग्रामसेवक देवूबाई शिंदे यांच्या तक्रारीवरुन उस्माननगर पोलिसांनी गुन्हा नोंद केला. या प्रकरणाचा तपास पोउपनि थोरे हे करीत आहेत. तर दुसऱ्या घटनेत नाकाबंदी का केली म्हणून एका पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करण्यात आली. ही घटना १८ मार्च रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शहरात घडली.
पोहेकॉ एकनाथ मोकले हे बाफना टी पॉईंट येथे कर्तव्यावर होते. या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी आरोपीने नाकाबंदी का केली असे म्हणत मोकले यांची कॉलर धरुन शिवीगाळ केली. या प्रकरणात इतवारा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
प्रसूतीच्या खर्चासाठी विवाहितेचा छळ
प्रसूतीसाठी माहेरहून दहा लाख रुपये घेऊन येण्याच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ करण्यात आला. ही घटना नागपूर येथे घडली. पीडित विवाहितेला सासरच्या मंडळीकडून पैशाची मागणी करण्यात येत होती. मागणी पूर्ण होत नसल्याने उपाशीपोटी ठेवून विवाहितेला मारहाण करण्यात आली. या प्रकरणात वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.