नांदेड : भोकर तालूक्यातील वाकद शिवारातील सिताखांडी तलावात एका ५० वर्षीय शेतकऱ्यासह एका १५ वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी १.३० वाजता घडली.
याबाबत अधिक माहिती अशी कि, वाकद शिवारातील गट क्र. ७९ मधील आपल्या शेतात विठ्ठल मारोती मांजळकर (५०) हे शेणखत टाकत होते. यावेळी त्यांनी आपला मुलगा शिवाजी व गावातीलच गोविंद ग्यानोबा वाकतकर (१५) याला मदतीसाठी सोबत घेतले. शेणखत टाकल्यानंतर गोविंद व शिवाजी हे दोघे शेता जवळील सिताखांडी तलावात हात-पाय धुण्यासाठी उतरले. यावेळी गोविंद हा अचानक पाण्यात बुडू लागला, हे पासून शिवाजीने आरडाओरडा केली. मुलाच्या आवाजाने मांजळकर तेथे आले आणि त्यांनी तत्काळ गोविंदला वाचविण्यासाठी तलावात उडी घेतली. मात्र, गोविंदला वाचविण्यात त्यांना अपयश आले. यासोबतच मांजळकरसुद्धा तलावात बुडाले आणि त्यांचाही मृत्यू झाला.
घटनेची माहिती शिवाजीने गावात जावून दिल्यानंतर गावातील लोक घटनास्थळी धावून आले. पोहेका उमेश कारामुंगे व पोलीस कर्मचारी एस.के.कंधारे यांनी पंचनामा करुन भोकर पोलीसात आकस्मिक मृत्यूची नोंद केली. या दुर्दैवी घटनेने वाकद गावावर शोककळा पसरली होती. मयत गोविंद हा सिताखांडी येथील संत गाडगेबाबा आश्रमशाळेत आठव्या वर्गात शिक्षण घेत होता. आई - वडीलांना एकुलता एक मुलगा होता. तर मयत शेतकरी विठ्ठल मारोती मांजळकर यांच्यावर कुटुंबाची सारी बिस्त होती, त्यांच्या पश्चात पत्नी, ४ मुली, २ मुले असा परिवार आहे.