नांदेड : जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली निघणार नाही तोपर्यंत सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय नांदेड तालुक्यातील सुगाव बु. येथील मराठा समाजाने घेतला आहे. तसे निवेदन ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
महाराष्ट्रात विदर्भ, खान्देश, तसेच इतर ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण आहे. तेथील मराठा समाज ओबीसीमध्ये आहे. उर्वरित राहिलेल्या महाराष्ट्रातील मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण मिळावे म्हणून गेली अनेक वर्षे महाराष्ट्रात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले आहे. अनेक मोर्चे निघाले, राज्यातील हजारो मराठा युवकांवर गुन्हे दाखल झाले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाला एसईबीसी प्रवर्ग करून आरक्षण दिले. या आरक्षणानुसार अनेक मुलांना नोकरीचे काॅल आले आहेत; परंतु सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यामुळे त्या उमेदवारांना ज्वाईन करून घेतले जात नाही. यातून मुलांची मन:स्थिती बिघडत आहे, तसेच आरक्षणासाठी अनेकांना आपला जीव गमवावा लागला; परंतु अद्यापपर्यंत आरक्षण प्रश्न निकाली निघालेला नाही. सर्वच पक्ष मराठा समाजाला वेठीस धरून आरक्षणाचे राजकारण करू पाहत आहेत. त्यामुळे सुगाव (बु.), ता.जि.नांदेड येथील सर्व मराठा समाजाने येणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, विधानसभा, लोकसभा या सर्व निवडणुकांवर, तसेच सर्व पक्षांवर बहिष्कार टाकणार असल्याबाबतचा ठराव सर्वानुमते घेतला आहे.