नांदेड : शासकीय कार्यालयात लाच देऊन काम काढून घेणे, हे नित्याचेच झाले आहे. झटपट श्रीमंत होण्याच्या नादात अनेकांना खिसा गरम केल्याशिवाय चैनच पडत नाही. परंतु, ही सवय अनेकांच्या अंगलटही आली आहे. लाच देण्याची इच्छा नसलेले अनेकजण त्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे धाव घेत आहेत. पथकाकडून अशा लाचखोरांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. नांदेड परिक्षेत्रात साधारणत: शंभर रुपयांपासून ते दोन कोटी रुपयांंपर्यंतच्या लाचेची मागणी झाल्याची उदाहरणे आहेत.
महसूल, पोलीस विभाग सर्वात पुढे
n लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नांदेड, लातूर, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांत केलेल्या कारवाईत महसूल आणि पोलीस विभाग सर्वात पुढे आहे. महसूलमध्ये कामासाठी तर पोलीस विभागात तक्रार दाखल करून न घेणे, गुन्ह्यात मदत करणे, अटक न करणे, कोठडीत चांगली वागणूक देणे यासह इतर अनेक कारणांसाठी लाचेची मागणी करण्यात येते. त्यात पोलीस कर्मचा-यांपासून ते वरिष्ठपदावरील अधिकारीही लाचेच्या जाळ्यात अडकले आहेत.
दोन कोटींची मागणी
एका गुन्ह्यात न गोवण्यासाठी परभणी येथील उपअधीक्षकांनी तब्बल दोन कोटी रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाचलुचपतने या अधिका-याला पकडले.
ना-हरकतीसाठी शंभर रुपये लाच
काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात एका ग्रामसेवकाने शेतक-याला ना-हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी चक्क शंभर रुपये लाचेची मागणी केली असल्याचा प्रकार उघडकीस आला.
गेल्या सहा महिन्यांत परिक्षेत्रात एकूण ३६ ट्रॅप लावण्यात आले आहेत. तक्रार आल्यानंतर अगोदर त्याची पडताळणी केली जाते. नंतर सापळा रचण्यात येतो. नागरिकांनी लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रारी कराव्यात.
- पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर