नांदेड : वाळूचे तीन टिप्पर चालू ठेवण्यासाठी तसेच त्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई होऊ नये यासाठी २१ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ती स्वीकरताना लोहा तालुक्यातील कापशी बु़ येथील मंडळ अधिकारी नन्हू गणपतराव कानगुले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला आहे़ ही कारवाई शहरातील सिडको परिसरात शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास करण्यात आली़ कानगुले हा तलाठी संघटनेचा जिल्हाध्यक्ष आहे़
लोहा तालुक्यातील मंडळ अधिकारी एऩजी़ कानगुले (वय ४६, रा़वात्सल्यनगर सोसायटी सिडको) यांनी एका व्यक्तीस वाळूच्या वाहतुकीसाठी दर महिन्याला प्रत्येकी १० हजार रुपयाप्रमाणे तीन वाहनांचे मिळून एकूण ३० हजार रुपये लाच देण्याची मागणी केली होती़ या वाहतुकदाराच्या मेहुण्याने या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली़ दरम्यानच्या काळात तडजोडीअंती २१ हजार रुपये स्वीकारण्यास मंडळ अधिकारी कानगुले यांनी सहमती देऊन १० हजार रुपये पहिल्या टप्प्यात स्वीकारले़ तर उर्वरित ११ हजार रुपये मिळविण्याचा प्रयत्न केल्याचे लाचलुचपत विभागाने सिडको येथे रचलेल्या सापळ्यावेळी स्पष्ट झाल्याने मंडळ अधिकारी कानगुले यांच्याविरूद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पोलीस निरीक्षक कपिल शेळके यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ गंगातीर्थ, जगन्नाथ अनंतवार, विलास राठोड, ताहेर खान, शेख मुजीब यांनी ही कारवाई केली़ कानगुले हे अर्धापूर तालुक्यात तलाठी म्हणून कार्यरत होते़ नुकतीच त्यांना लोहा तालुक्यात मंडळ अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली होती़