भोकर : लोकसभा निवडणुकीत नव मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मोठा उत्साह दाखविला. यातच भोकर विधानसभा मतदार संघातील एका नववधूने लग्नाच्या दिवशीच होत असलेल्या मतदानात बुथवर जावून मतदानाचा हक्क बजावल्याने मतदानासारख्या मौलीक अधिकाराकडे दुर्लक्ष करणाऱ्या नागरिकांना चांगलेच उदाहरण देवून लोकशाहीचा उत्सव साजरा केल्याची सर्वत्र कौतूकाने चर्चा होत आहे.लग्न म्हन्टले की, नवयुवक व युवतींना आनंदाची पर्वणी असते. परंतू त्याचबरोबर नागरिक म्हणून देशाच्या विकासाचा कणा असलेल्या लोकशाहीत आपले प्रतिनिधी मतदान करुन संसदेत पाठवणे हे ही मोठे कर्तव्यच, याचे जान ठेवून लोकसभा निवडणुकीत भोकर विधानसभा मतदार संघातील मुदखेड येथे नववधू कोमल गोविंद कावळे (रा. धनगरटेकडी) यांनी वडील गोविंद कावळे व वर अनिल बालाजी रेगुलवाड (रा. पिंपळकौठा) यांना सोबत घेवून मतदान केंद्र क्र. २४८ वर जावून मतदानाचा हक्क बजावला. या नव दांपत्यासाठी आजचा दिवस लग्नाचा व मतदानाचा आयुष्यभर अविस्मरणीय राहील. नववधू आणि नवरदेव चक्क लग्नाच्या मांडवातून मतदानासाठी आलेले पाहून उपस्थित मतदारांनी आश्चर्य व्यक्त केले.गडग्यात ६५ टक्के मतदानगडगा : लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाला नायगाव तालुक्यातील गडगा केंद्रावर मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला. सकाळी व दुपारच्या नंतर रांगा लावल्या होत्या. प्रक्रिया शांततेत पार पडली.गडगा येथील मतदान केंद्रावर दोन बुथवर एकूण २२९५ पैकी १४९९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.यात स्त्री ७३५,पुरूष ७६४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.ऐन दुपारच्या वेळी केंद्रावर काही वेळ शुकशुकाट होता.दुपारी चार वाजल्यानंतर मात्र मतदान केंद्रावर मतदारांनी रांगा लावल्या होत्या. मतदान केंद्राच्या ठिकाणी काँग्रेसचे आमदार वसंत चव्हाण, भाजपचे राजेश पवार, शिवराज पाटील-होटाळकर,श्यामसुंदर शिंदे,रयत क्रांती संघटनेचे पांडुरंग शिंदे-मांजरमकर, बहुजन वंचित आघाडीचे उत्तम गवाले,निळकंठ ताकबीडकर आदींनी भेटी दिल्या. कुठल्याही प्रकारची अनूचित घटना घडता कामा नये यासाठी पोलीस विभागाच्या वतीने एपीआय इंगळे यांच्यासह वरीष्ठ अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या.निवडणूक विभागाच्या फिरते पथकाने भेट देऊन मतदान प्रकियेचा आढावा घेतला.
लग्नाच्या दिवशी नववधू- वरांनी बजावला मतदानाचा हक्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 12:42 AM