बाराहाळीत पेट्रोल शंभरी पार
बाराहाळी - शहरात पेट्रोलने यापूर्वीच शंभरी पार केली असून ग्रामीण भागातही पेट्रोल १०० रुपयांच्या वर गेले आहे. बाराहाळीत पेट्रोल पंपावर आता प्रतिलिटर १०१ रुपये १६ पैसे मोजावे लागत आहेत. डिझेलचे दरही शतकाच्या उंबरठ्यावर असून १ लिटर डिझेलसाठी ९१.२९ रुपये द्यावे लागत आहेत. सध्या शेतातील कामे ट्रॅक्टरद्वारे सुरू असल्याने मशागतीचे भाव वाढले आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
शेणखत, गांडूळ खताचा वापर करावा
देगलूर - शेतकऱ्यांनी शेणखत, कंपोस्ट, गांडूळ खताचा वापर करावा, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. मागील काही वर्षात शेतकऱ्यांनी चांगले पीक घेण्यासाठी रासायनिक खताचा वापर मोठ्या प्रमाणात केला. या खतापासून उत्पन्न झालेले अन्नधान्य आरोग्यासाठी धोकादायक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जीवाणूच्या खताचा एकात्मिकरित्या वापर करावा असे आवाहन केले.
निवाऱ्याची दुरावस्था
किनवट - तालुक्यातील अनेक गावातील एसटी महामंडळाच्या प्रवासी निवाऱ्याची दुरावस्था झाली आहे. महामंडळाची बससेवा गेल्या एक महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे निवाऱ्याच्या दुरावस्थेत अधिकच भर पडली आहे. अनेक प्रवासी निवाऱ्यावर टीन पत्रे नाहीत. त्यामुळे प्रवाशांना उन्हात व पावसात बसची प्रतीक्षा करावी लागत आहे.
२२ रोजी निदर्शने
बिलोली - केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या निषेधार्थ बिलोली विकास आघाडीच्या वतीने २२ मे रोजी दुपारी १२.३० वाजता बिलोली तहसील कार्यालयासमोर कोविड नियमावलीचे पालन करून निदर्शने करण्याचा इशारा बिलोली विकास आघाडी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी युनायटेड, भारतीय लहुजी सेना, आझाद आदिवासी कोळी, महादेव संघटना यांनी दिला आहे.
तामशात कोरोना कीटचे वाटप
हदगाव - तालुक्यातील तामसा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना माजी आ.नागेश पाटील आष्टीकर यांच्या हस्ते कोरोना कीटचे वाटप करण्यात आले. यावेळी रमेश घंटलवार, विजय बास्टेवाड, गंगाधर सोनमनकर, तेजस उंबरकर, सुभाष बास्टेवाड, सुरेश कोडगीरवार, आकाश जाधव, शाकेर पठाण, बबन जाधव, नाना विभुते आदी उपस्थित होते.