लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्ह्यात विविध देखण्या पर्यटन कलाकृती आहेत. त्यामुळेच आघाडी सरकारच्या काळात नांदेड टुरिझम सर्किटला मान्यता दिली. आता पर्यटकांचा जिल्ह्यामध्ये ओघ वाढत आहे. येणा-या काळात होट्टलसह नांदेड जिल्हा पर्यटनाच्या जागतिक नकाशावर आणण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने पुढाकार घेऊ, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी केले.शनिवारी सायंकाळी खा. चव्हाण यांच्या हस्ते होट्टल महोत्सवाचे उद्घाटन झाले. या प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर आ. डी. पी. सावंत, आ. अमरनाथ राजूरकर, आ. सुभाष साबणे, आ. वसंतराव चव्हाण, आ. नागेश पाटील आष्टीकर, आ. हेमंत पाटील, जि. प. अध्यक्षा शांताबाई जवळगावकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जि. प. चे मुख्य कार्यकारी अशोक शिनगारे, मनपाचे आयुक्त गणेश देशमुख यांच्यासह पदाधिका-यांची उपस्थिती होती.होट्टल महोत्सवाच्या माध्यमातून शानदार सोहळा आयोजित केल्याबद्दल प्रारंभी खा. चव्हाण यांनी संयोजन मंडळासह यासाठी पुढाकार घेतलेल्या सर्वांचे कौतुक केले. होट्टलची कलाकृती अतिशय देखणी आणि प्राचीन आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले होते. सिद्धेश्वराचे जुने मंदिरही मोडकळीस आले होते.राज्याचा सांस्कृतिकमंत्री असताना होट्टलसह जिल्ह्यातील इतर पर्यटनस्थळांचे नांदेड टुरिझम सर्किट स्थापन करुन मोठ्या प्रमाणात निधी दिला. त्यामुळेच या पर्यटनस्थळाच्या विकासाला गती मिळाली. मात्र मध्यंतरीच्या काळात विकासकामे मंदावली. आजच्या या कार्यक्रमासाठी मंत्रीमहोदयांना आमंत्रित करण्यात आले होते. ते जर आले असते तर त्यांच्याकडे या कामांच्या पूर्णत्वाची तसेच निधीची मागणी करता आली असती, परंतु ते अनुपस्थित असल्याने योगायोगाने माझ्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. कदाचित सिद्धेश्वरांनाही महोत्सवाचे उद्घाटन माझ्याच हस्ते व्हावे असे मान्य असावे असे ते म्हणाले. प्रास्ताविक आ. सुभाष साबणे यांनी केले. महोत्सवासाठी राजकारणापलीकडे जावून आमदारांनी निधी दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले. आ. अमरनाथ राजूरकर यांनी शासनाचा एकही प्रतिनिधी महोत्सवाच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहिला नाही, याबद्दल खंत व्यक्त केली. होट्टलच्या विकासासाठी यापुढील काळातही एकत्रित येऊन प्रयत्न करु, अशी ग्वाही दिली.यावेळी आ. वसंत चव्हाण, माजी आमदार रावसाहेब अंतापूरकर, आ. नागेश पाटील आष्टीकर, अनिल पाटील खानापूरकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, व्ही. एल. कोळी, तहसीलदार महादेव किरवले, नीळकंठ पाचंगे, समाधान जाधव, जि. प. सदस्य रामराव नाईक, शिक्षण सभापती मिसाळे, शिवाजीराव देशमुख, प्रवीण पाटील चिखलीकर, कृषी सभापती रेड्डी, लक्ष्मण ठक्करवाड, देगलूरचे नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार, माजी आ. गुरुनाथराव कुरुडे, मुक्ताबाई कांबळे, विश्वास देशमुख, शेषराव सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती.
आ. साबणे यांच्या प्रास्ताविकाचा धागा पकडत राज्य शासनाकडे पाच-पाच लाख रुपये काय मागतात. होट्टलच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांकडे जावून १० कोटींची मागणी करा, अशी सूचनाही खा़चव्हाण यांनी केली. सध्याचे यूग डिजिटलचे आहे. त्यामुळे डिजिटल माध्यमांचा उपयोग करुन होट्टलसह जिल्ह्यातील पर्यटने स्थळे जागतिक नकाशावर पोहोचवा. गुरुद्वारा, माहूर, कंधार, नांदेड किल्ल्यांसह होट्टल अशी जिल्ह्यातील पर्यटनस्थळाची साखळी निर्माण करा. सध्या नांदेडमध्ये विमानसेवा सुरु आहे. त्याचा फायदा उचलत जगभरातील पर्यटक नांदेडमध्ये कसे येतील याचेही नियोजन करा, असे ते म्हणाले.