मुखेड ( नांदेड ) : मोठा भाऊ आणि वहिनीने माझ्या कमाईतील पैस्यांवर घेतलेली प्रॉपर्टी बळकावली आहे. यामुळे मी आत्महत्या करत आहे, असा व्हिडीओ व्हायरल करत एका युवकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी तालुक्यातील हिब्बट येथे उघडकीस आली आहे. रमाकांत हणमंतराव कागणे ( ३६ ) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी मोठा भाऊ आणि त्याच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
रमाकांत हणमंतराव कागणे हा मोठा भाऊ गोविंद सोबत गुत्तेदारी करायचा. तर दुसरा भाई दत्ता शेती करायचा. गुत्तेदारीतून मिळालेले पैसे मोठा भाऊ स्वतःच्या बँक खात्यावर जमा करयचा. याच पैस्यांतून नांदेड, देगलुर आणि गावात प्लाॅट घेतले. नांदेड येथे घर बांधकाम सुरु आहे. आता एकत्र कुटुंबातून विभक्त रहाण्याचा विचार रमाकांत याने केला. शेती आणि कमाईतील प्राॅपर्टिचा हिस्सा त्याने मागितला. तेव्हा मोठा भाऊ गोविंद व वाहिनी अनुसया यांनी, तुझा कसलाही वाटा नाही, तुला काहीही मिळणार नाही, असे सांगितले. यामुळे व्यथित झालेल्या रमाकांत याने आज सकाळी मोबाईलमध्ये व्हिडीओ करून शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. माहिती मिळताच पोलिस निरिक्षक विलास गोबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक नरहरी फड, बिट जमादार हणमंत वाघमारे, पो.ना.गंगाधर चिंचोरे, पोलिस अमलदार शिवाजी आडबे, मारोती मेकलेवाड यांनी घटनास्थळी पाहणी केली. मृत रमाकांतच्या पश्चात पत्नी, एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे.
व्हिडिओमध्ये काय, ''मला न्याय द्या, मी रमाकांत हणमंतराव कागणे, रा हिब्बट. मला माझा भाऊ गोविंद कागणे व त्याची पत्नी हे शेती व कमाईतील प्राॅपर्टिचा हिस्सा देत नाहीत. म्हणून मी आत्महत्या करत आहे. मला माफ करा. माझ्या पत्नीला व मुलाबाळांना न्याय द्या.'' असा व्हिडिओ आत्महत्येपूर्वी रमाकांत याने केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून गावात हळहळ व्यक्त होत आहे.