नांदेड : महाराष्ट्रात सध्या तेलंगणातील भारत राष्ट्र समितीच्यावतीने जोर लावण्यात येत आहे; परंतु या ठिकाणी राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसला नुकसान पोहोचविण्याचाच ‘बीआरएस’चा प्रयत्न आहे, असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. शुक्रवारी (दि. १९) सायंकाळी प्रगट मुलाखतीदरम्यान त्यांनी प्रादेशिक पक्षांच्या भूमिकांवर आपले मत व्यक्त केले.
तेलंगणातील भारत राष्ट्र समितीने आपल्या पक्षाचा देशव्यापी विस्तार करण्याच्या उद्देशाने पहिले पाऊल महाराष्ट्रातील नांदेडातच टाकले आहे. गेल्या काही महिन्यांत तेलंगणाचे मुख्यमंत्री तथा ‘बीआरएस’चे नेते के. चंद्रशेखर राव यांनी तिसऱ्यांदा नांदेडचा दौरा केला आहे. तसेच शुक्रवारी त्यांनी राज्यभरातील २८८ विधानसभा मतदारसंघांतील प्रमुखांचे शिबिरही नांदेडातच आयोजित करून राज्याची व्यूहरचना नांदेडातून करण्याचा संदेश दिला. त्यावर खासदार संजय राऊत यांनी टीका केली. ते म्हणाले, तेलंगणात काँग्रेसची स्थिती मजबूत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत ‘बीआरएस’कडून तेलंगणा हातचे जाईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्याचमुळे ‘बीआरएस’कडून महाराष्ट्रात काँग्रेसला नुकसान पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोणत्याही पक्षाला राज्य आपल्या हातून जाऊ नये, असेच वाटते, असेही राऊत म्हणाले.
मेळाव्यात पदाधिकाऱ्यांमध्ये राडानांदेड उत्तर मतदारसंघात ठाकरे गटाचा मेळावा खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत शुक्रवारी पार पडला. भाषणात खा. राऊत यांनी ही गुरुगोविंदसिंघजी यांची पवित्र भूमी असल्याचा उल्लेख केला. भाषण संपल्यानंतर व्यासपीठावरून खाली उतरत असताना वाहतूक आघाडीचे रामगडिया यांनी त्याबद्दल राऊत यांचे आभार मानले. त्याच वेळी जिल्हाप्रमुख माधव पावडे तिथे आले. यावेळी दोघांमध्ये राऊत यांच्यासमोरच शाब्दिक बाचाबाची आणि ढकला-ढकली झाली. या प्रकाराची उपस्थितांमध्ये चर्चा सुरू होती.