किनवट : घराचे बांधकाम करणाऱ्या मिस्त्री व शेजारच्या महिलेच्या डोक्यात फावड्याने वार करून दोघांनाही निर्घृणपणे ठार मारल्याची घटना बुधवारी (दि. २९) दुपारी ४.३० वाजता किनवट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अंबाडी येथे घडली. पोलिसांनी आरोपी उत्तम भरणे यास तत्काळ अटक केली आहे.
मयत मिस्त्री शेख वसीम शेख महेबूब कुरेशी (२९, रा. इस्लामपुरा, किनवट) याच्या मारेकऱ्याला फाशी द्यावी म्हणत घोषणाबाजी करत चक्क प्रेत नातेवाइकांनी पोलिस ठाण्यात आणले. दगडफेक करून गोकुंदा व शहरातील दुकाने बंद करण्यात आली. तणावपूर्ण शांतता प्रस्थापित झाल्याने भोकरचे अपर पोलिस अधीक्षक डॉ. के. ए. धरणे हे वेळीच किनवट शहरात दाखल झाले. बंदोबस्तासाठी मांडवी, सिंदखेड व इस्लापूर ठाण्याचे पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर तणाव निवळला. आरोपीला मानसोपचार तज्ज्ञाच्या गोळ्या चालू असल्याची माहिती आहे. हल्ल्याचे कारण अजूनही अस्पष्टच आहे.
पोलिस सूत्रानुसार व प्राप्त माहितीनुसार, किनवट पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अंबाडी येथे आरोपी उत्तम भरणे यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. किनवट येथील शेख वसीम शेख महेबूब कुरेशी (२९) हा २९ मे रोजी घराचे बांधकाम करण्यासाठी अंबाडी येथे गेला. वीट बांधकाम करत असतानाच अचानक आरोपी उत्तम भरणे याने मिस्त्री शेख वसीम यांच्या डोक्यात फावड्याने जबर वार केला. गंभीर दुखापत झाल्याने वसीम रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यानंतर शेजारी असलेल्या विशाखा भारत मुनेश्वर (५०) या विधवेच्या डोक्यात त्याच फावड्याने निर्घृणपणे वार केला. यात महिलेचा अक्षरशः मेंदू बाहेर पडला होता. दोघांनाही गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉ. प्रतीक्षा डोंगरे यांनी मृत घोषित केले, तर विशाखा मुनेश्वर या महिलेला आदिलाबाद येथे रेफर केले असताना महिलेचाही मृत्यू झाला.
नातेवाइकांनी प्रेत आणले पोलिस ठाण्यात
गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयातील प्रेत घेऊन नातेवाईक पोलिस ठाण्यात आले. आरोपीला फाशी देण्यात यावी म्हणून घोषणाबाजी करत दुकाने बंद करण्यात आली. काहींनी दगडफेकही केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मांडवी, इस्लापूर व सिंदखेड पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले. खुद्द भोकरचे अपर पोलिस अधीक्षक डॉ. के. ए. धरणे, किनवटचे उपविभागीय पोलिस अधिकारी रामकृष्ण मळघणे, पोलिस निरीक्षक सुनील बिर्ला लक्ष ठेवून होते. ठाण्यात आणलेले प्रेत पोलिस बंदोबस्तात परत शवविच्छेदन करण्यासाठी गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.