नांदेड: 'बीएसएफ' अर्थात सीमा सुरक्षा दलात 'नाईक' पदावर कार्यरत कामेश विठ्ठलराव कदम (कंधारकर) यांचे ९ जुलै रोजी हरियाणा येथे कर्तव्यावर असताना श्वास घेण्यास त्रास झाल्यानंतर उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर ११ जुलै रोजी सकाळी नांदेडच्या सिडको परिसरातील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
कामेश विठ्ठलराव कदम-कंधारकर (४२) हे नांदेडच्या हडको परिसरातील रहिवासी होते. ते २० वर्षांपासून 'बीएसएफ'मध्ये कार्यरत होते. सध्या ते हरियाणा येथे नाईक पदावर कार्यरत होते. कर्तव्यावर असताना ९ जुलै रोजी सकाळी सव्वानऊ वाजेदरम्यान श्वास घेण्यास त्रास झाल्यानंतर प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांना हरियाणा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथेच उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. निधनाची वार्ता समजताच नातेवाईकांसह मित्रमंडळीने हडको येथील त्यांच्या निवासस्थानी धाव घेत कुटुंबियांचे सांत्वन केले. जवान कदम यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, १० वर्षीय मुलगा, दोन भाऊ असा परिवार आहे.
उद्या होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कारजवान कामेश कदम यांचा पार्थिवदेह दिल्लीहून विशेष विमानाने हैदराबाद येथे आणण्यात येईल. त्यानंतर विशेष मोटारीद्वारे पार्थिवदेह ११ जुलै रोजी सकाळी ८ वाजता नांदेड येथे निवासस्थानी पोहोचले. त्यानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे.