पूर्वी बीएसएनएलच्या लँडलाईनच्या सेवेला कोणीही चॅलेंज करू शकत नव्हते; परंतु मागील काही वर्षांत या सेवेचेदेखील तीनतेरा वाजले आहेत. त्यामुळे ग्राहकांकडून इंटरनेटच्या सुविधेसाठी खासगी कंपन्यांना पसंती दिली जात आहे.
नांदेडसह जिल्ह्यातील अनेक ठिकाणची इंटरनेट सेवा विस्कळीत झाल्याने ग्राहकांना मनस्तापास सामोरे जावे लागत आहे. त्यात सध्या ऑनलाईन वर्गावर भर असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्यास बीएसएनएलदेखील जबाबदार ठरत आहे.
रस्त्यांच्या कामामुळे असुविधा
बीएसएनएलच्या सुरळीत सेवांमध्ये रस्त्यांच्या कामामुळे अडथळे निर्माण होत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. नांदेड जिल्ह्यात नायगाव-बिलोली मार्गे हैदराबाद येथून, पुणे येथून औरंगाबाद मार्गे, सोलापूर येथून लातूर मार्गे केबल लाईन टाकलेली आहे; परंतु चारही रस्त्यांची कामे सध्या सुरू आहेत. खोदकाम करताना केबलचे नुकसान होऊन कनेक्टिव्हिटीस अडथळे निर्माण होत असल्याचे कारण देत बीएसएनएलने हात वर केले आहेत.