दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेचे उद्घाटन भदन्त डॉ. उपगुप्त महाथेरो यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी परिषदेचे मुख्य संयोजक डॉ. एस.पी. गायकवाड यांचीही उपस्थिती होती. तथागतांनी मानव कल्याणासाठी बुद्ध धम्म दिल्याचे सांगत धम्मातील पंचशील तत्त्वे, आर्य आष्टांग मार्ग याचे अनुसरण केल्यास मानवी जीवनातून दु:खाचा ऱ्हास होण्यास मदत मिळते. त्याचबरोबर शुद्ध आचरणामुळे आयुष्य सुखकर होते. त्यामुळेच बुद्ध धम्म उपयुक्त असल्याचे भदन्त इंदवंश महाथेरो यांनी सांगितले.
गुरुवारी सकाळी त्रिरत्न वंदना, परित्राण पाठ, महाबोधी वंदना, धम्म ध्वजारोहण आदी कार्यक्रम पार पडले. रात्री एलईडी स्क्रीनवर उपस्थित उपासकांना इटली, फ्रान्स, श्रीलंकेसह इतर देशांतील भिक्खू संघ ऑनलाइन धम्मदेसना देणार आहेत. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी २९ जानेवारी रोजी तथागतांच्या उपदेशावर भिक्खू संघाकडून धम्मदेसना दिली जाणार असून शुक्रवारी रात्री या धम्म परिषदेचा समारोप होणार आहे. परिषदस्थळी कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर शारीरिक अंतराचे पालन करून उपस्थित जनसमुदाय भिक्खू संघाच्या धम्मदेसनेचा लाभ घेऊ शकतो. त्यासाठीची व्यवस्थाही आयोजकांनी केली आहे.