चाैकट...
पैनगंगा नदीत रेती माफियांची चालती
पैनगंगा नदीमध्ये रेती माफियांची माेठ्या प्रमाणात चालती आहे. प्रशासन व शासकीय यंत्रणाही त्यांच्या रेती तस्करीकडे जाणीवपूर्वक डाेळेझाक करते. आर्णी-माहूरच्या सीमेवरून दरदिवशी २०० ट्रक रेतीचा उपसा व तस्करी केली जाते. रेती माफियांना त्रास हाेऊ नये म्हणून हेतुपुरस्सर धरणाचे पाणी नदीत साेडले जात नाही, अशी ओरड हाेत आहे. धरणात पाणी असताना ते सिंचनासाठी उपलब्ध का करून दिले जात नाही, असा शेतकऱ्यांचा प्रशासनाला सवाल आहे. धरण नसल्याने पैनगंगा नदीतील पाणी पुढे वाहून जाते. प्रशासन एकीकडे धरणाचे पाणी नदीत साेडता येत नसल्याचे शेतकऱ्यांना सांगते. मग हेच पाणी पावसाळ्यात साेडून शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त केली जातात. उन्हाळ्यात पाण्याअभावी पिके वाळतात तर खरिपात धरणातील पाणी साेडले जात असल्याने पिके वाहून जातात. प्रशासकीय कारभारातील या विसंगतीचा शेतकऱ्यांना कायम सामना करावा लागताे.
चाैकट....
पाण्याच्या शाेधात वन्य प्राण्यांचाही मृत्यू
उन्हाळ्यात धरणातील पाणी साेडले जात नसल्याने नदी काेरडी पडते. पर्यायाने त्यातील मासे, कासव मृत्युमुखी पडतात. नदीला लागूनच असलेल्या टिपेश्वर व पैनगंगा अभयारण्यातील वन्य प्राण्यांनाही पाण्याअभावी मृत्यूचा सामना करावा लागताे. उन्हाळ्यात पाणी साेडण्यासाठी दरवर्षी ग्रामपंचायतींचे ठराव मागितले जातात. त्या माध्यमातून अडवणूक हाेते. वास्तविक, सुमारे ३०० किमी परिसरात रेती तस्करांसाठी अप्रत्यक्षरीत्या पायघड्या घातल्या जात असल्याचा आराेप जगताप यांनी केला आहे.