- भारत दाढेल
नांदेड : मागील दोन वर्षांपासून रखडलेल्या अंगणवाडी इमारत बांधकामासाठी आता मनरेगातून निधी उपलब्ध झाला असून जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात २०० अंगणवाडी इमारतीचे बांधकाम होणार आहे़ त्यामुळे उघड्यावर भरणार्या अंगणवाड्यांना आता हक्काची इमारत मिळणार आहे़
जिल्ह्यात बालविकास प्रकल्प विभागाकडून चालविण्यात येत असलेल्या अंगणवाड्या इमारत नसल्यामुळे खाजगी भाडेतत्त्वावर खोलीत तसेच शाळा, समाजमंदिर, उघड्यावर झाडाखाली भरविण्यात येतात़ सध्या सुरू असलेल्या अंगणवाड्यांमध्ये बालकांसाठी आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध नाहीत़ त्यामुळे या अंगणवाड्यांची परिस्थिती वाईट आहे़ दरम्यान, अंगणवाडी केंद्राच्या बांधकामासाठी संबंधित पंचायत समितीकडून जिल्हा परिषदेला गेलेले प्रस्ताव सादर केले होते़ परंतु ते धूळखात होते़ मागील दोन वर्षांपासून अंगणवाडी इमारतीच्या बांधकामांचा प्रश्न रखडला होता़ गतवर्षी ७५० अंगणवाड्यांच्या बांधकामांना मंजुरीही मिळाली होती़ राज्यातील १३ जिल्ह्यांत ३ हजार ६३२ अंगणवाड्यांचे बांधकाम करण्यात येणार होते़ मात्र राज्य शासनाने आपला वाटा उपलब्ध करून दिला नाही, त्यामुळे या अंगणवाड्यांचे बांधकाम सुरूच झाले नाही़ या अंगणवाड्यांचे बांधकाम कधी होणार? असा प्रश्न निर्माण झाला होता़ अंगणवाड्यांना इमारतीच नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवरही परिणाम होत होता़ अखेर मनरेगातून हा
प्रश्न मार्गी लागला आहे़ जिल्ह्यातील २०० अंगणवाडी इमारतीच्या बांधकामासाठी जिल्हा परिषदेने मंजुरी दिली आहे़ मनरेगा योजनेतंर्गत ५ लाख, केंद्र शासनाकडून १ लाख २० हजार व राज्य शासनाचे ८० हजार असे मिळून ७ लाख रूपये प्रत्येक अंगणवाडी इमारतीसाठी मंजूर करण्यात आले आहेत़ शासनाच्या तरतुदीनंतर या इमारतीच्या बांधकामाला एप्रिल, मे मध्ये सुरूवात होणार आहे़ जिल्ह्यात एकूण ३ हजार १० अंगणवाडी केंद्र आहेत़ त्यापैकी १ हजार १० अंगणवाड्यांच्या इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे़
अंगणवाडीत शून्य ते सहा वयोगटातील बालकाच्या पूर्व प्राथमिक शिक्षणाचा पाया पूर्ण होतो़ याशिवाय त्यांना आहार देवून बालकांचे आरोग्य सृदृढ करण्याची मोठी जबाबदारी अंगणवाडीसेविका पार पाडत असतात़ परंतु शासनाच्या उदासीन धोरणामुळे अनेक अंगणवाड्या उघड्यावर भरविल्या जात आहेत़ स्वतंत्र इमारत नसल्याने अनेकवेळा आहारात विषबाधा, इमारत कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत़ शासनाच्या नवीन अंगणवाडी बांधकामात आता सुरज वर्गखोली, आहारासाठी कोठार, बालकांसाठी प्रसाधनगृह उपलब्ध होणार आहे़
तालुकानिहाय अंगणवाड्यांची संख्याजिल्ह्यातील किनवट तालुक्यात १४, मुखेड- २२, देगलूर - १९, बिलोली - १२, कंधार -१५, भोकर- ८, हदगांव- २२, नांदेड-१६, लोहा-१६, नायगांव-९, माहूर-८, उमरी-८, मुदखेड-४, हिमायतनगर-८, धर्माबाद-११ तर अर्धापूर तालुक्यांत ८ अंगणवाड्यांचे बांधकाम होणार आहे़