भोकर (नांदेड) : तालुक्यातील लगळूद येथील माधव लक्ष्मण पंदलवाड व शंकर लक्ष्मण पंदलवाड हे दोघे भाऊ आपल्या जनावरांना घेऊन शेताकडे निघाले असता वाटेतील वाघू नदीला आलेल्या पुरात तब्बल ६ तास अडकून पडले होते. मात्र, दैव बलवत्तर म्हणून सोबतच्या जनावरांचा सहारा घेऊन दोन्ही भाऊ सुखरुप पुरातून बाहेर आले. ही घटना तालुक्यातील रावणगाव शिवारात आज घडली.
मागील दोन दिवसांपासून तालुक्यात संततधार सुरु असल्याने, नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. दरम्यान, लगळूद येथील दोघे भाऊ जनावरे चारण्यासाठी शेताकडे निघाले होते. वाटेतील वाहू नदीला आलेल्या पुरात जनावरांसह अडकले होते. त्यांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी महसूल प्रशासन व रावणगाव येथील ग्रामस्थ सरसावले. परंतु, पूराचा जोर अधिक असल्यामुळे ग्रामस्थ पाण्यात उतरण्यास धजावत नव्हते.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी दाखल झालेले तहसीलदार राजेश लांडगे, नायब तहसीलदार रेखा चामनार, तलाठी डांगे, मस्के यांनी नांदेड येथून रेस्क्यू ऑपरेशन पथकाला बोलावण्याच्या तयारीत असतांनाच पूरात अडकलेले दोन्ही भाऊ सोबत असलेल्या जनावरांच्या शेपटीला धरुन सुखरूप काठावर पोहचल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला. तब्बल सहा तास दोघे भाऊ पूरात अडकून पडले होते. प्रशासकीय यंत्रणा व मानवी धाडस जेथे कमी पडले तेथे सर्जाराजाने आपल्या धन्यास वाचविल्याची चर्चा परिसरात होत आहे.