नांदेड - जुन्या नांदेडमधील सराफा बाजार भागातील नगरेश्वर मंदिराजवळ असलेल्या एका साडी दुकानाला आग लागून दुकानातील लाखो रुपयांचा माल जळून भस्मसात झाला. ही घटना सोमवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडली. सराफा बाजारात नगरेश्वर मंदिराजवळ अब्दुल बासिद यांचे रहेमान साडी आणि ड्रेस मटेरियल हे दुकान आहे. या दुकानाला सोमवारी पहाटे अचानक आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे दोन बंब सराफा बाजारात पोहोचले. मात्र, सराफा बाजारातील रस्ते लहान असल्याने अग्निशमन बंब दुकानापर्यंत जात नव्हते. अखेर अग्निशमन दलाने १०० फुटांचे तीन होज पाईप व ५० फुटांचे दोन होज पाईप जोडून दुकानापर्यंत पाणी पोहोचविले. त्यामुळे काही वेळानंतर ही आग आटोक्यात आणल्याचे अग्निशमन दलाचे प्रमुख रईस पाशा यांनी सांगितले. स्थानिक नागरिकांनीही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. इतवारा पोलीसही घटनास्थळी पोहोचले होते. या आगीत दुकानातील लाखों रुपयांचा माल भस्मसात झाला. इतवारा पाेलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून, ही आग नेमकी कशामुळे लागली, ते कळू शकले नाही.
जुन्या नांदेडातील साडी दुकान जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 4:44 AM