नांदेड : वरातीत फटाके फोडणे चांगलेच महागात पडले आहे. या आगीत नवीन कार आणि दुचाकी जळून खाक झाली. ही घटना नांदेड शहरातील तारासिंग मार्केट परिसरात रविवारी घडली. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.
दरम्यान आज रविवार असल्याने दुकाने उशिरा उघडली जातात. त्यामुळेच कारलगत असलेली इलेक्ट्रॉनिक दुकाने आगीपासून बचावली. सदर दुकानांचे शटर बंद असल्याने आग आतमध्ये पसरली नाही. वेळीच अग्निशमन दलाचे पथक दाखल झाल्यानंतर त्यांनी सदर आग आटोक्यात आणली.
लग्नाच्या वरातीत लावलेल्या फटाक्यांमुळे ही लागल्याची माहिती मिळाली आहे. पेटते फटाके उडून गाडी खाली पडले आणि त्याठिकाणी असलेल्या कचऱ्याला आणि त्यानंतर गाडीलाच खालून आग लागली. या आगीने रौद्ररूप धारण केले होते, त्यानंतर बाजूला असलेल्या दुचाकीने पेट घेतला. परंतु, शटर बंद असल्याने इलेक्ट्रॉनिकच्या दुकानात आग पसरण्याच्या अगोदरच अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.रईस पाशा,अग्निशमन अधिकारी, मनपा, नांदेड