देगलूर आगारातून मंगळवारी दुपारी दोन वाजता देगलूर ते बाऱ्हाळी बस (क्र. एमएच १४ बीटी १५०४) नवीन बसस्थानकातून निघाली होती. ही बस शहरातील आर्य समाज मंदिर परिसरातून जात असताना कार (क्र. एमएच २६ ए. के. ४५७२) चालकाने बसगाडी अडविली. बसचालकास बाहेर खेचले आणि माझ्या कारला साईड का दिली नाही असे म्हणत कारचालकाने बेल्ट काढून इतरांच्या सोबतीने मॉब लिंचिंग पद्धतीने बेदम मारहाण केली. तसेच बसगाडीच्या काचा फोडल्या. या प्रकरणी बसचालक रामचंद्र मारोती सिंगनवाड (वय ४५ रा. कर्णा. ता. मुखेड) यांच्या तक्रारीवरून कारचालकासह इतर तिघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा व इतर कलमान्वये देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मंगळवारी गुन्हा दाखल होऊनही बुधवारपर्यंत एकाही आरोपीस अटक करण्यास पोलिसांना यश आले नाही. या प्रकरणी राजकीय दबाव असल्याची चर्चा होत आहे.