नांदेड : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या विभागाअंतर्गत जवळपास ९ आगार आहेत. यामध्ये जवळपास ३५०० कर्मचारी-अधिकारी कार्यरत आहेत. बहुतांश आगारांमध्ये मर्जीतील तसेच संघटना पदाधिकारी असणाऱ्या चालक-वाहकांनाच लाईट ड्युटी दिली जाते. यासंदर्भात लेखी तक्रारी करुनही विभाग अथवा आगार पातळीवर वरिष्ठांकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याचे अनेक चालक-वाहकांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
नांदेड विभागअंतर्गत नांदेडसह भोकर, किनवट, माहूर, मुखेड, कंधार, हदगाव, आदी ठिकाणी आगार असून या सर्वच ठिकाणांहून जिल्हाअंतर्गत तसेच जिल्ह्याबाहेर बससेवा दिली जाते. परंतु, ज्या कर्मचाऱ्यांचे संघटनेशी हितसंबंध नाहीत अशांना लांबपल्ल्याची अवघड मार्गाची ड्युटी लावली जाते.
डयुटीसंदर्भात गेल्या महिन्याभरात काही तक्रारीमर्जीतील चालक-वाहकांना नांदेडसह सर्वच आगारात सोईची डयुटी दिली जाते. तर काही कर्मचाऱ्यांच्या शारीरिक वा इतर अडचणीच्या कारणास्तव एखाद्या गावची ड्युटी मागुनही त्यास तशी ड्युटी दिली जात नाही. परंतु ठरावीक कर्मचाऱ्यांना त्याच त्या मार्गावर ड्युटी दिली जाते. यासंदर्भात तक्रारी करुनही आगार व्यवस्थापक अथवा विभागीय कार्यालयातील वरिष्ठांकडून कार्यवाही केली जात नाही.
चालक, वाहकांना डयुटी देताना कशी राखली जाते मर्जीनांदेडसह विभागातील सर्वच आगारांमध्ये संघटनांचे राजकारण जोरात सुरु असते. त्यात वाहतूक निरीक्षकांकडून ड्युटी घेण्यासाठी संघटना पदाधिकाऱ्यांकडून दबाव टाकला जातो. याबाबत अनेक वेळा वादही झाले. परंतू संघटना-पदाधिकारी यांची मर्जी राखत त्यांना हिंगोली, वसमत अशा लाईट ड्युटी दिली जाते. सर्व सामान्य वाहक-चालकांना दहा ते १२ तास ड्युटी करावी लागते. तर पदाधिकारी कर्मचाऱ्यांची ड्युटी पाच ते आठ तासांतच पूर्ण होते.
नांदेड आगारामध्ये कोणत्याही कर्मचाऱ्यांवर भेदभाव केला जात नाही. रोटेशन पद्धतीने ड्युटी दिली जाते. आगारातील सर्वच चालक-वाहक एकसमान असून त्यांच्यावर कुठलाही अन्याय होणार नाही, यासाठी प्रशासनाकडून सर्वेातोपरी काळजी घेतली जाते. तसेच या संदर्भात कधी काही तक्रार आली तरीही ती तात्काळ सोडविण्याचा आमचा प्रयत्न राहिला आहे. - वर्षा येरेकर, आगारप्रमुख, नांदेड