नांदेड - काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा आज नांदेड शहरात दाखल झाली. यावेळी त्यांच्या साथीला राष्ट्रवादीचे दिग्गज नेते दिसून येत आहेत. राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे आणि प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या सहभागाने यात्रेत उत्साह संचारला होता. राज्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते आज नांदेडमध्ये दाखल झाले असून महाराष्ट्रातील राहुल गांधींची पहिली जाहीर सभा आज पार पडली. सभेत बोलताना राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला. तसेच, भारत देशात पैशाची कमी नाही, पण तो सर्वाधिक पैसा काही मोजक्याच उद्योगपतींच्या खिशात भरला जातोय, असे राहुल यांनी म्हटले.
राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेच्या सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधला. देशातील लोकांना कंगाल करण्याचं काम मोदींनी केलंय. काही वर्षांपूर्वी देशात नोटबंदी जाहीर केली आणि सर्वसामान्य व लहान व्यापाऱ्यांची कोंडी केली. जीएसटी कायदा लागू केला, शेतकऱ्यांच्या मालावर कर लावला. केंद्रातील मोदी सरकार हे केवळ काही बड्या उद्योगपतींसाठी काम करतंय. आपल्या देशात पैशाची कमतरता नाही, पण तो पैसा फक्त याच उद्योगपतींकडे आहे. देशातील शेतकरी, मजदूर, लहान व्यापाऱ्यांच्या खिशातून हा पैसा काढला जातोय. दिल्लीत बसून एक बटण दाबलं जातं आणि इकडे शेतकरी, मजदूर यांच्या खिशातून पैसा निघून जातो, असे म्हणत राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला.
मोदींनी दिलेल्या आश्वासनांचं काय झालं, २ कोटी रोजगारांचं काय झालं, १५ लाख रुपयांचं काय झालं, काळ्या पैशाचं काय झालं? असे प्रश्न राहुल यांनी उपस्थित जनतेला विचारले. तसेच, आरएसएसवाले केवळ स्वत:साठी मागण्याचं काम करतात. मात्र, काँग्रेस देण्याचं काम करते, असे म्हणत राहुल यांनी केदारनाथमध्ये त्यांना आलेला एक अनुभवही येथील जाहीर सभेत बोलून दाखवला.
राहुल गांधींची यात्रा ही चळवळ
राहुल गांधींची भारत जोडो यात्रा ही एकच चळवळ आहे. इतर नेते जे करतात तो इव्हेंट असतो आणि ही यात्रा म्हणजे मूव्हमेंट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा आईला भेटायला जातात, तेव्हा त्यांचा चेहरा कुठे असतो, मोदींचा चेहरा कॅमेऱ्याकडे असतो. मात्र, आपण सर्वांनीच पाहिलं आहे. भारत जोडो यात्रेत जेव्हा सोनिया गांधींनी सहभाग घेतला. त्यावेळी सोनिया गांधीच्या पायातील बुटाची लेस निघाली होती. राहुल गांधींनी खाली वाकून आईच्या पायातील बुटाची लेस बांधली. त्यावेळी, राहुल गांधींचा चेहरा कुठे होता, आपण सर्वांनीच पाहिलंय, राहुल गांधींचा चेहरा त्यांच्या आईच्या पायाशी होता, असे म्हणत नाना पटोले यांनी इव्हेंट आणि मूव्हमेंटमधील फरक सांगितला.