नांदेड: पाळत ठेवून चोरट्यांनी सराफा व्यापाऱ्याच्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली ६० लाख किंमतींचे सोन्याचांदींचे दागिन्यांची बॅग लंपास केली. ही धाडसी चोरी आज सकाळी पावणेदहा वाजेदरम्यान नांदेडच्या सिडको वसाहतीमधील सराफा बाजारात घडली.
नांदेडच्या सिडकोतील सराफा मार्केटमध्ये प्रशांत प्रभाकरराव डहाळे यांचे श्री गुरूकृपा ज्वेलर्स या नावाचे सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे दुकान आहे. डहाळे आज सकाळी नेहमीप्रमाणे दुकान उघण्यासाठी सकाळी साडे नऊ ते पावणेदहा वाजेच्या दरम्यान दुचाकीवर (एमएच-२६ एस- २३५१) आले. त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीत जवळपास १ किलो सोन्याचे दागिने होते. दुचाकी रस्त्यावर लावून ते दुकानाचे कुलूप उघडण्यासाठी गेले. मात्र, कुलुपामध्ये चिकट पदार्थ असल्याने डहाळे खूपवेळ उघडण्याचा प्रयत्न करत होते.
हीच संधी साधत चोरट्यांनी दुचाकीची डिक्की उघडून दागिने असलेली बॅग पळवली. काहीवेळाने डहाळे यांना डिक्की उघडी असल्याचे निदर्शनास आले. बॅगेत १ किलो वजनाचे सोन्याचे आणि तीन किलो चांदीचे असे जवळपास ६० लाखांचे दागिने असल्याची तक्रार डहाळे यांनी नांदेड ग्रामीण ठाण्यात दिली आहे.
माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे तातडीने घटनास्थळी भेट दिली. डीवायएसपी सुशीलकुमार नायक, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर तसेच नांदेड ग्रामीण ठाण्याचे पोलिस निरीक्षक जगदीश भंडरवार, सपोनि. श्रीधर जगताप, पोउपनि. आनंद बिचेवार आदी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तातडीने भेट देवून पाहणी केली. भरदिवसा चोरट्यांनी लाखो रूपयांच्या दागिन्यांची बॅग लंपास केल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.