नांदेड : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या अकरा हजारांच्या पुढे गेली आहे़ त्यामुळे सर्वच रुग्णालये हाऊसफुल्ल झाली असून रुग्णांना बेड मिळविण्यासाठी आटापिटा करावा लागत आहेत़ त्यातच नॉन कोविड रुग्णाला तब्बल बारा तास फिरुनही खाट न मिळाल्याने रुग्णालयाबाहेर रुग्णवाहिकेतच आपला जीव सोडावा लागला़ हा धक्कादायक प्रकार रविवारी रात्री घडला़
कोरोनाचा जिल्ह्यात संसर्ग वाढतच आहे़ दररोज तीनशेहून अधिक बाधित रुग्ण आढळत आहेत़ त्यातच सर्व शासकीय रुग्णालये आणि खाजगीत खाट मिळविण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे़ यात कोरोना रुग्णांबरोबर इतर आजारांच्या रुग्णांचीही ससेहोलपट होत आहे़ रविवारी रात्रीही असाच संतापजनक प्रकार घडला़ कंधार तालुक्यातील दिग्रस बु़ येथील बालाजी वसंतराव चिद्रावार (वय ६८) यांची अँटीजेन तपासणी करण्यात आली होती़ त्यात त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला़
परंतु, श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रविवारी दुपारी दीड वाजता नातेवाईकांनी रुग्णवाहिकेतून त्यांना नांदेडला आणले होते़ शहरातील प्रत्येक रुग्णालयात ते गेले़ परंतु सर्वांनी एकही खाट शिल्लक नसल्याचे सांगितले़ शेवटी विष्णूपुरी येथील डॉ़ शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात गेले़ परंतु या ठिकाणीही खाट मिळाली नाही़ दुपारपासून रुग्णवाहिकेत असलेले बालाजीराव वेदनेने विव्हळत होते़ परंतु, कोरोनाचा संसर्ग झालेली माणुसकीच व्हेंटिलेटरवर गेल्याने त्यांची निराशा झाली़ शेवटी बालाजी चिद्रावार यांनी रात्री अडीच वाजेच्या सुमारास रुग्णालयाबाहेर रुग्णवाहिकेतच शेवटचा श्वास घेतला़ यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी टाहो फोडला़
डॉक्टरांना बोलवा होदुपारी दीड वाजेपासून रुग्णवाहिकेत असलेल्या बालाजीराव यांची प्रकृती तासागणिक ढासळत चालली होती़ आपल्याला एकही रुग्णालय दाखल करुन घेत नसल्यामुळे त्यांच्या मनाला जबर धक्का बसला होता़ त्यातच डॉक्टरला बोलवा हो़़़मला उपचाराची गरज आहे, असा टाहो ते फोडत होते़ परंतु नातेवाईकही हतबल होते़ अश्रू गाळण्याशिवाय त्यांच्याकडेही पर्याय नव्हता़ शेवटी रुग्णवाहिकेतच बालाजीराव यांना जीव सोडावा लागला़
डॉक्टरांनी येवून पाहिले नाहीमाझ्या वडिलांना दुपारी दीड वाजता उपचारासाठी नांदेडात आणले होते़ रुग्णवाहिकेतून ते स्वत: उतरत होते़ शहरातील सर्व रुग्णालयात आम्ही गेलो़ आमदारांचे शिफारसपत्रही आणले होते़ एकाही ठिकाणी डॉक्टरने येवून त्यांची तपासणीही केली नाही़ परंतु, एकाही रुग्णालयाने कोरोना नसतानाही त्यांना दाखल करुन घेतले नाही़ शेवटी रात्री दीड वाजता त्यांची प्राणज्योत मालवली़ असा कसा हा कारभार? माणसाच्या जीवाची काही किंमत आहे की नाही? असा संतप्त सवाल स्वाती संगनवार व साईनाथ चिद्रावार यांनी केला आहे़