लोकमत न्यूज नेटवर्कउमरी : येथील नगरपालिका प्रशासनाने शहरातील डासांचा नायनाट करण्याची मोहीम सुरू केली असून तालुक्यातील हिवताप नियंत्रण पथक मात्र गायब असल्याचे दिसून येत आहे.उमरी शहरात या वर्षीच्या पावसामुळे अनेक नाल्या तुंबल्या आहेत़ शहरातील गल्लीबोळात गाजर गवताच्या झाडांची वाढ मोठ्या प्रमाणावर झाली आहे़ या घाणीमुळे शहरात सध्या डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे़ मलेरिया तसेच डेंग्यूसदृश अनेक रुग्ण दवाखान्यात दाखल होत आहेत़ ही गंभीर स्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने शहरात गल्लीबोळातून फॉगिंग मशीनद्वारे डासांचा नायनाट करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
- शहरातील मोंढा मैदान, बालाजी मंदिर, जुना गाव परिसर, रापतवारनगर आदी ठिकाणी फॉगिंग मशीनद्वारे फवारणी करण्यात आली. शहरात नगरपालिका प्रशासन याबाबत गंभीर असले तरी तालुक्यातील अनेक गावात या वर्षीच्या पावसामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातूनही मलेरिया, डेंगूसदृश्य रुग्णांचे प्रमाण वाढले आहे.
प्रत्येक गावात मोहीम राबवा
- दिवसेंदिवस ही संख्या वाढत असताना हिवताप नियंत्रण पथक मात्र उमरी तालुक्यात गायब असल्याचे दिसून येते. शहरात या पथकाचे कार्यालय कुठे आहे हाही एक संशोधनाचा भाग झाला आहे. याबाबत कुणाकडेही माहिती उपलब्ध नाही. जिल्हा आरोग्य प्रशासनाने याची गांभीर्याने नोंद घेऊन उमरी तालुक्यातील प्रत्येक गावात फॉगिंग मशीन अथवा स्प्रे पंपाद्वारे डासांचा नायनाट करण्याची मोहीम हाती घ्यावी, अशी नागरिकातून मागणी होत आहे.