- गोविंद टेकाळेअर्धापूर (नांदेड) : ''लेकरांचे शिक्षण करण्यात कमी पडत आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही'' , अशा आशयाची सुसाइड नोट लिहून मराठा आरक्षणासाठी आणखी एका ३३ वर्षीय तरुणाने गुरुवारी रात्री जीवन संपवले. नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर तालुक्यातील सावरगाव येथील ही घटना असून किशन बाबुराव आबादार असे मृताचे नाव आहे.
तालुक्यातील सावरगाव येथील किशन बाबुराव आबादार याने मराठा आरक्षणासाठी जीवन संपवल्याचे पुढे आले आहे. ''मी लेकरांचे शिक्षणात कमी पडतो, मराठा समाजाला आरक्षण मिळावे'', अशा आशयाची अशी चिठी लिहून किशन याने गुरुवारी रात्री राहत्या घरात गळफास घेतला. त्याच्या पश्चात पत्नी, सात वर्षांचा एक मुलगा, सहा वर्षाची एक मुलगी असा परिवार आहे. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी घटनास्थळी भेट दिली. सुबोध आबादार यांच्या खबरी वरून अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तुकाराम बोईनवाड करत आहेत.
मराठा आरक्षण चळवळीचे गावमराठा आरक्षणाच्या चळवळीतील गाव म्हणून सावरगाव या गावाची ओळख आहे. येथील ग्रामस्थ आरक्षण लढ्यात सक्रिय असून महिलांनीही देखील साखळी उपोषणात सहभाग घेतला होता. दरम्यान, ऑगस्ट २०१८ रोजी याच सावरगाव येथील गणपत बापुराव आबादार यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी छतावरून उडी घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून दहा लाखाची मदत मिळाली आहे. सध्या त्यांच्या पत्नी मनकर्णा गणपत आबादार ( ३८ ) या राज्य परिवहन मंडळ नांदेड येथे कार्यरत आहेत.