पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तनगर, नांदेड येथील रहिवासी तथा घरगुती खानावळीचे चालक संतोष जिजाभाऊ मुटकुळे यांनी त्यांची मेस चालविण्यासाठी दोन वर्षांपूर्वी हरबळ (ता.लोहा) येथील गणेश शिंदे यांचेकडून ३० हजार रुपये तसेच विष्णूपुरी येथील नागेश येईलवाड यांच्याकडून ५० हजार रुपये व्याजाने घेतले होते. परिणामी, गणेश शिंदे व नागेश येईलवाड हे दोघेही व्याज घेण्यासाठी दर महिन्याला संतोष मुटकुळे यांच्या दत्तनगर, नांदेड येथील घरी येत होते, असा उल्लेख मृत संतोष मुटकुळे यांच्या मातोश्री सुमित्राबाई जिजाभाऊ मुटकुळे यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्येच नमूद असल्याची माहिती ठाणे अंमलदार ज्ञानोबा गीते व मदतनीस पो.कॉ. अश्विनी मस्के यांनी दिली आहे.
विशेष बाब म्हणजे, घरगुती खानावळ चालक संतोष मुटकुळे हे हरबळ येथील गणेश शिंदे यांना दीड हजार व विष्णूपुरी येथील नागेश येईलवाड यांना दर महिन्याला अडीच हजार रुपये व्याज देत होते, असा उल्लेखही सुमित्राबाई मुटकुळे यांच्या तक्रारीमध्ये नमूद असल्याचेही पोलीस सूत्रांनी सांगितले. दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सरकारने मार्च २०२० पासून लॉकडाऊन केल्यामुळे लॉकडाऊनच्या काळात संतोषचा मेसचा व्यवसाय बंद होता. परिणामी, संतोष मुटकुळे आर्थिक अडचणीत आले होते, त्यामुळे उपरोल्लेखित दोघांना वेळेवर व्याज देऊ शकत नव्हते. दरम्यानच्या कालावधीत उपरोल्लेखित दोघे जण संतोषच्या घरी येऊन तसेच संतोषच्या फोनवर फोन करून पैसे देण्यासंदर्भात वारंवार तगादा लावत होते. याशिवाय, १५ दिवसापूर्वी येईलवाड हा दुपारी दोन वाजेदरम्यान घरी आला आणि संतोषच्या पत्नीसमोर माझे पैसे वेळेवर दिलास तर ठीक आहे, नाही तर तुला उचलून नेतो, म्हणून धमकी देऊन निघून गेला. दरम्यान, आपण घरी आल्यानंतर मुलगा संतोषने उपरोल्लेखित घडलेला प्रकार आपणास सांगितले असल्याचाही उल्लेख सुमित्राबाई यांनी तक्रारीत नमूद केला आहे.
याशिवाय आपला मुलगा संतोष हा नेहमी म्हणायचा की, आपण गणेश शिंदे व नागेश येईलवाड यांना वारंवार पैसे देऊन कंटाळलो आहे. त्याचवेळी त्यांच्या त्रासाला कंटाळून आपण आपले जीवन संपविणार असल्याचेही तो वारंवार म्हणायचा. पण आपण त्याला समजावून सांग त असे. मात्र, तो उपरोक्त दोघांच्या त्रासाला कंटाळून १५ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजेदरम्यान कुणालाही काहीच न सांगता घरातून निघून गेला. त्यानंतर तो घरी परत आला नाही. अखेर १८ ऑगस्ट रोजी दुपारी नांदेड ग्रामीण ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल माधव गवळी यांनी आपल्या नातेवाईकांना फोन करून विष्णूपुरी येथील मंदिरामागील नदीच्या पात्रात संतोष मुटकुळेंचे प्रेत सापडले असल्याचे सांगितले आहे.
याप्रकरणी सुमित्राबाई जिजाभाऊ मुटकुळे यांच्या तक्रारीआधारे नांदेड ग्रामीण ठाण्यात अखेर उपरोल्लेखित दोन आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सपोनि. विश्वजित कासले व पो.कॉ. शंकर बिरमवार हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.