लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : नांदेड शहर कॅरिबॅगमुक्त करण्याचा संकल्प महापालिकेने केला आहे़ त्यानुसार नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून शहरात कॅरिबॅग बंदी सुरु करण्यात आली़ मनपा अधिका-यांसह कर्मचा-यांनी विविध भागातील व्यापा-यांना भेटून याबाबत मार्गदर्शन केले़ पहिल्याच दिवशी बहुतांश व्यापा-यांनी दुकानात कॅरिबॅग मिळणार नाही असे फलक लावल्याचे दिसून आले़महापालिकेने लागू केलेल्या कॅरिबॅग बंदीनुसार ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरिबॅगला शहरात पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे़ बंदी लागू असतानाही कॅरिबॅगचा वापर सुरु असल्याचे दिसून आल्यास सुरुवातीला कॅरिबॅग जप्त करण्यात येऊन कॅरिबॅग न वापरण्याबाबत तंबी देण्यात येणार आहे़ त्यानंतर दुस-या टप्प्यात ही मोहीम अधिक तीव्र करीत दंडासोबत संबंधितांविरुद्ध फौजदारी कारवाईदेखील केली जाणार आहे़ सोमवारी बहुतांश दुकानदार ग्राहकांना कॅरिबॅग मिळणार नाही, महापालिकेने कॅरिबॅग दिल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे़ त्यामुळे घरुन येतानाच पिशवी घेवून यावे, असे सांगताना दिसून आले़ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, महिनाभर कॅरिबॅग जप्तीची मोहीम राबविण्यात येणार असून त्यानंतर मात्र कॅरिबॅगचा वापर आढळून आल्यास प्रारंभी पाच हजार, दुस-या वेळी दहा हजार तर तिस-या वेळी पंचवीस हजार रुपये दंडासह फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे़
कॅरिबॅग बंदीला मिळतोय प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 1:04 AM