कागदपत्रांसाठी अडवणूक
नांदेड : शासकीय कर्मचारी, तसेच इतर अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलिसांकडून वाहनाचे आरसी बुक, लायसन्स आदी कारणावरून अडविले जात आहे. कोरोना काळात घराबाहेर पडून कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून पोलिसांनी अडविल्यानंतर आयडी कार्ड दाखविले जाते, परंतु काही कर्मचारी जाणीवपूर्वक इतर कागदपत्रांची विचारणा करून त्यांना वेठीस धरत आहेत.
स्वच्छतेची कामे करावीत
नांदेड : शहरातील बहुतांश नगरातील नाल्या तुंबल्या आहेत. त्यात वजिराबाद परिसरातील अंतर्गत नगरामध्ये बाजारपेठा सुरू असताना, साफसफाईची कामे करण्यास अडथळे निर्माण होतात, परंतु लॉकडाऊनमुळे सर्वकाही बंद असताना, या ठिकाणी, तसेच इतर वस्त्यांमधील नाल्या, तसेच चेंबर्सची कामे पूर्ण करून घेण्याची मागणी होत आहे.
उघड्या डीपीकडे दुर्लक्ष
नांदेड : महावितरणकडून सध्या वीजबिल वसुलीसाठी मोहीम राबविण्यात येत आहे, परंतु अपार्टमेंट, तसेच सार्वजनिक ठिकाणी असलेले डीपी उघडे असल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वसुलीप्रमाणे महावितरणने डीपी, तसेच लोंबकळलेल्या तारांकडे लक्ष देण्याची गरज आहे. शहरातील अनेक ठिकाणी उघड्या डीपी असून, त्यास पत्र्याचे बॉक्स बसविण्याची आवश्यकता आहे.
हळद काढणीला वेग
नांदेड : ग्रामीण भागात सध्या हळदी काढणीच्या कामास वेग आला आहे. लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद असल्या, तरी शेतकरी आपल्या कामात मग्न झाला आहे. त्यात सध्या हळद काढणीच्या कामांना वेग आला आहे. गुत्ते देऊन हळद काढून घेण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे, परंतु पाऊस जास्त झाल्याने काही शेतकऱ्यांना अत्यल्प उत्पादन होत आहे, तर काहींना भरघोस माल निघत आहे.
छुप्प्या मार्गाने दारू विक्री
नांदेड : शहरातील जवळपास सर्वच वाइन शॉपसमोर छुप्या मार्गाने आणि वाढीव दराने दारूची विक्री सुरू आहे. कोणत्याही वाइन शॉपसमोर जाऊन उभे राहिले, तर चार-दोन युवक येऊन काेणती हवी, अशी विचारणा करतात. त्यानंतर, ऑर्डर केली की वाढीव दराने जे हवे ते मद्य आणून सदर युवक देत आहेत. लॉकडाऊनच्या नावाखाली ही एक प्रकारे लुटच सुरू आहे.