नांदेड शहरात अनलॉक प्रक्रियेनंतर दुचाकीस्वारांकडून नियमबाह्य पद्धतीने दुचाकी चालविणे, स्टंट करणे अथवा बुलेटच्या सायलेन्सरमधून फटाके फोडणे अशा घटना वाढल्या आहेत. दरम्यान, अशाप्रकारे नियमबाह्य पद्धतीने वाहने चालविणाऱ्यांविरोधात वाहतूक शाखेच्या वतीने कारवाईची मोहीम राबविण्यात येत आहे. दरम्यान, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम हे सहकाऱ्यांसोबत कर्तव्यावर असताना त्यांनी एका बुलेटस्वारावर कारवाई केली. सदर बुलेट (एमएच २६- बीडब्ल्यू- ०२९२) दीपक सल्लावार यांच्या मालकीची आहे. त्यांनी बुलेटला सायलेन्सर चुकीच्या पद्धतीने व फटाके वाजविणारे बसविले होते. त्यामुळे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक कदम यांनी त्यांच्यावर कारवाई केली.
या कारणामुळे झाली कारवाई
सायलेन्सरच्या आवाजाने सर्वसामान्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चलन नंबरनुसार वाहनधारक दीपक दत्तात्रय सल्लावार यांच्याविरुद्ध २ जून रोजी रात्री साडेआठच्या सुमारास चलन नंबरप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात आली. या कारवाईचा राग मनात धरून बुलेटधारक दीपक सल्लावार, रा. माउली निवास, लोहार गल्ली, बिलोली, जिल्हा नांदेड याने त्याचा फोटो असलेल्या दीपक डी. एस. या फेसबुक अकाउंटवरून नांदेडच्या ‘नांदेडकरांचा कट्टा’ या फेसबुक ग्रुपवर सार्वजनिकरीत्या पोलीस निरीक्षकांची बदनामी होईल, अशा पोस्ट पाठविल्या. पाठविलेल्या पोस्टमध्ये अश्लील शिवीगाळ करून, तसेच धमकी देणाऱ्या पोस्ट व्हायरल केल्या. त्यामुळे पोलीस निरीक्षकांसह पोलीस कर्मचाऱ्यांची बदनामी केल्याप्रकरणी सल्लावार याच्यावर वजिराबाद ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.